मविआ अल्पमतात असल्याचे जाहीर होण्याची वाट पाहतोय – मुनगंटीवार

मुंबई : सत्ताधारी महाविकास आघाडीमधील मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली एक मोठा गट आसाम येथील गुवाहाटीमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मु्क्कामाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे.

तूर्तास तरी भाजपाला बहुमत सिद्ध करण्याची गरज नाही. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचे कधी जाहीर करतायत, याची आम्ही वाट पाहतोय, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. येत्या काही दिवसांत आवश्यकता भासल्यास कोअर टीमची आणखी एक बैठक बोलावू. मात्र, तूर्तास तरी भाजपाची भूमिका वेट अॅण्ड वॉचचीच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आघाडी सरकार अल्पमतात – दरेकर
राज्यातील राजकीय स्थिती अस्थिर असून सत्ताधारी महाविकास आघाडी अल्पमतात आहे. अशा परिस्थितीतही दिवसाला 200 ते 300 जीआर काढले जात आहेत. हा जनतेचा पैसा आहे. राज्यपालांनी दखल घेऊन याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.