शेतात काम करत असताना महिलेचा गळा आवळून खून; अंगावरील दागिने केले लंपास

येवला : तालुक्यातील मुखेड शिवारातील नवीन कॅनलजवळ शेतात काम करणार्‍या महिलेला उसाच्या शेतात ओढून नेत उपरण्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, महिलेच्या अंगावरील दागिने लुटून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी येवला पोलीस ठाण्यात अनोळखी युवकाविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेखा बाळासाहेब आहेर (वय 40) मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव बाळासाहेब आहेर यांची आई सुरेखा बाळासाहेब आहेर सायंकाळी 6 वाजता शेतात काम करत होत्या. त्यावेळी रस्त्याने जाणार्‍या एका युवकाने फोनवर बोलत असल्याचा बहाणा करत सुरेखा आहेर यांच्याजवळ आला. त्याने अचानक त्यांना उसाच्या शेतात ओढून नेत उपरण्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यांच्या अंगावर असलेले 40 हजारांचे दागिने चोरी करुन पळ काढला. सायंकाळी उशिर झाल्याने मुलगा वैभव आहेर आईला शोधण्यासाठी शेतात गेला असता त्यांना एक संशयित उसाच्या शेतातून पळत जात असल्याचा दिसला. त्यांनी पाठलाग केला. मात्र, तो अंधराचा फायदा घेत फरार झाला. त्यांना उसाच्या शेतात एक महिला मृतावस्थेत आढळून आली. तात्काळ सरकारी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचार सुरु होण्यापुर्वी डॉक्टरांनी महिलेस मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात महिलेचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून येवला कडून मुखेडकडे येणार्‍या सर्व रस्त्यांवर पाहणी केली. घटनास्थळी काही संशयास्पद वस्तू नसल्याने पोलिसांच्या तपासाला अडथळे निर्माण होत आहेत.