नाशिकमधल्या शेतकऱ्यांकडून चक्क कांद्याची होळी, बळीराजा ढसाढसा रडला

कांद्याची होळी पेटवत संतप्त शेतकऱ्यांनी सरकारच्या नावाने बोंबाबोंब केली.

onion-issue-yeola
कांद्याची होळी पेटवत संतप्त शेतकऱ्यांनी सरकारच्या नावाने बोंबाबोंब केली.

सध्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. हे संकट कमी होतं की काय म्हणून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला आहे. एकीकडे कांद्याला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले रब्बी पिके मातीमोल होत असलेलं पाहून शेतकऱ्याने होळीच्या दिवशी शेतातील उभे कांदे जाळले.

सुरवातीला कांद्याला चांगला भाव मिळाला, पण आता शेतकऱ्यांचा माल येऊ लागताच दर घटले. त्यातच आता अवकाळा पावसानेही या संकटात भर घातली आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. चांगला बाजारभाव मिळून दोन पैसे हातात येतील या आशेने नाशिकच्या येवला येथील शेतकऱ्यांनी दिवसरात्र एक करून कांद्याचे संगोपन केले. त्यांच्या कष्टाला यशही मिळाले. मात्र बाजारपेठेत भाव मिळाला नाही. कांद्यातून चार पैसे कमवणं तर सोडाच पण पिकवण्याचा आणि वाहतुकीचा खर्चही निघत नाहीये.. आणि म्हणूनच या शेतकऱ्यांनी आपलं कांद्याचं पीक जाळून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

येवला येथील शेतकऱ्यांनी सकाळी ११ वाजता कांद्याचा पिकाला अग्निडाग देऊन कांद्याचीच होळी केलीय. यावेळी दिवसरात्र एक करून पिकवलेला कांदा आपल्या डोळ्यादेखील जळताना पाहून शेतकरी राजा ढसाढसा रडताना दिसला. यावेळी कांदा जळत नसून कांदा विकून आपल्या कुटूंबासाठीचे पाहिलेलं स्वप्न जळताना त्यांच्या डोळ्यात दिसून आलं.

बाजार समित्यांमध्ये येऊन नाफेड कांदा खरेदी करेल अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात केली. मात्र अजूनही नाफेडची खरेदी सुरू झालेली नाही. कांद्याची होळी पेटवत संतप्त शेतकऱ्यांनी सरकारच्या नावाने बोंबाबोंब केली. नाशिक जिल्हा हा कांद्याची पंढरी म्हणून संपूर्ण आशिया खंडात ओळखला जातो. कांद्याची बाजारपेठ म्हणून लासलगाव बाजार समिती ही सर्वांना परिचित आहे. मात्र याच कांद्याच्या पंढरीतील शेतकऱ्यांना डोळ्यादेखत कांद्याचीच होळी करण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे.