भाजप VS मविआ सरकार: ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय..,नवाब मलिकांची राणेंवर खोचक टीका

महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. राज्यात आगामी काळात भाजप सरकार बनेल, अशी भविष्यवाणी राणेंनी केली आहे. यावेळी राणे जयपूरमध्ये होते, त्यावेळी त्यांनी दावा केला होता. दरम्यान, कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय, अशा प्रकारची खोचक टीका राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

नवाब मलिक यांनी नारायण राणे यांच्यावर टीका करत ट्विट देखील केलं आहे. काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय. असं त्यांनी राणेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

भाजपाचं सरकार लवकरचं महाराष्ट्रात येईल आणि तुम्हाला काही बदल झालेले दिसतील. तसेच सरकार पाडायचं की नाही. हे मोठं रहस्य आहे. त्यामुळे ही गोष्ट प्रसार माध्यमांसमोर सांगणं उचित नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, सध्या ते बेडवर आहेत. त्यांचं नाव घेणं उचित नाही. परंतु राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे त्यांची लाईफ ही राज्यात अधिक नाहीये. अशा प्रकारचं भाकित किंवा दावा नारायण राणे यांनी प्रसार माध्यमांसमोर केला होता.

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया…

नारायण राणे काय म्हणतात, यावर सरकार चालत नाही. सरकार संख्याबळावर चालतं. तसेच हे संख्याबळ महाविकास आघाडीकडे पूर्ण आहे. असा टोला राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.

अनिल परब यांच्यानंतर आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. हे स्लोगन राज्यात सातत्याने सुरू आहे. सूरूवातीपासूनचं आम्ही येणार असं त्यांनी सातत्याने सांगितलं आहे. परंतु ज्येष्ठ मंत्र्यांनी किंवा केंद्रीय मंत्र्यांनी कुठलंही वक्तव्य करताना त्यामध्ये प्रमाणीकरण असणं महत्त्वाचं आहे. अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

दरम्यान, भाजप नेते आणि केंंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि मविआ सरकारच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. तसेच महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आता राणेंच्या भाकित वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार ? हे पाहणं महत्त्वाच ठरणारं आहे.


हेही वाचा: Maharashtra Politics: राज्यात मार्चपर्यंत भाजपाचं सरकार येणार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भविष्यवाणी