घरमहाराष्ट्रडॅमेज कंट्रोलसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तातडीची बैठक

डॅमेज कंट्रोलसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तातडीची बैठक

Subscribe

वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार देणारे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना ईडीने २४ तासांची मुदत दिली आहे. जर २४ तासांत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाही, तर घरी येऊन चौकशी करु, असा आक्रमक पवित्रा ईडीने घेतला आहे. अनिल देशमुख यांच्यावर होत असलेल्या कारवाईमुळे एकप्रकारे पक्षाचं नुकसान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर होत असलेले आरोप, ईडीच्या चौकशा यामुळे पक्षाचं होत असलेलं नुकसान भरुन काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीने बैठक बोलावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हनुमान समजले जाणारे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सुनिल तटकरे आणि इतर नेते उपस्थित असणार आहेत. या बैठकीत अनिल देशमुख यांची होत असलेली ईडी चौकशीवर चर्चा होणार असल्याचं कळतंय. याशिवाय, राष्ट्रादीच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर आरोप होत आहेत. त्यावर देखील चर्चा केली जाणार असल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार यांची सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा ठराव मांडण्यात आला. तसंच, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून पत्र पाठवली जाणार असल्याचं बोललं जात आहे. तसंच आगामी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक या मुद्द्यांवर घेरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येणाऱ्या संकटांशी कसं लढावं, यासंदर्भात आज रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, या बैठकीत महामंडळाचं वाटप यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

शिवसेना बॅकफूटवर

तथापि, दुसरीकडे शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि महाविकास आघाडी स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय राऊत यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे पडद्यामागे काहीतरी शिजतंय अशा चर्चा सुरु आहेत. भाजप आणि शिवसेनेची युती होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. त्यात उद्धव ठाकरे शांत असल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. तसंच, भाजपकडून होत असलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार प्रताप सरनाईक आणि आता मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावल्याने उद्धव ठाकरे आणि शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात काय घडामोडी घडणार आहेत, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


हेही वाचा – चौकशीसाठी २४ तासांत हजर रहा, अन्यथा घरी येऊन चौकशी करु; ईडीचा देशमुखांविरोधात आक्रमक पवित्रा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -