नवीन अभ्यासक्रम, एकाच वेळी दोन पदव्या ते पार्टटाईम पीएच.डी.; मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्यासोबत विशेष संवाद

नाशिक : दूरशिक्षणाच्या माध्यमातून तीन दशकांहून अधिक काळ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात दूरशिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली आहे. बदलत्या काळानुसार आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुक्त विद्यापीठ नवीन अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणार आहे. मुक्त विद्यापीठात विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन पदव्या घेता येणार आहेत. तसेच, ऑनलाईन पदवी अभ्यासक्रम सुरु केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘माय महानगर’ने कुलगरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद..

– बदलत्या काळानुसार विद्यार्थीभिमुख नवीन अभ्यासांचे काही नियोजन आहे का?
: कुलगुरुपदाचा पदभार स्विकाल्यानंतर प्रथम प्राधान्य नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील अभ्यासक्रमांची पुनर्रचना केली जाणार आहे. त्या पुनर्रचनेनुसार रोजगाराभिमुख शिक्षणक्रम आणि पदवी शिक्षणक्रम ऑनलाईन स्वरूपात सुरू करणे यावर भर देणार आहे. तंत्रज्ञानाच्या आधारावर वंचित असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवले जाणार आहे. मुक्त विद्यापीठाच्या दृष्टीने नवशिक्षण धोरणानुसार एकाचवेळी विद्यार्थ्यांना दोन पदव्या घेता येणार आहेत. त्या घेत असताना एक नियमित व दुसरी ऑनलाईन किंवा दूरस्थ पद्धतीने घेता येणार आहे. मुक्त विद्यापीठात आता दूरस्थ पद्धतीने पदवी घेता येत आहे. आगामी काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने पदवी घेता येणार आहे. त्यासाठी प्राध्यान्य देणार आहे.

– पार्टटाईम पीएच.डी. अभ्यासक्रमाबाबत काय सांगाल?
: युनिर्व्हसिटी ग्रॅण्ट कमिशनने नवीन प्रवेशाचे नियम दिले आहेत. त्यानुसार पार्टटाईम पीएच.डी. करता येणार आहे. जे विद्यार्थ्यी व्यवसाय व नोकरी करतात. परंतु, त्यांना कामाच्या ठिकाणी असलेले प्रश्न सोडविता यावेत, त्यांना येणार्‍या समस्या सोडविण्यासाठी व संशोधनाचा आधार घेता यावा, यासाठी विद्यार्थ्यांना पार्टटाईम पीएच. डी. करता येणार आहे. मुक्त विद्यापीठात प्रवेशित झालेले अनेक विद्यार्थी नोकरी व व्यवसाय करणारे आहेत. ते करता-करता त्यांना पार्टटाईम पीच.डी. करता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाला पार्टटाईम पीएच.डी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सुरु करण्यासाठी प्रस्ताव दिला जाणार आहे.

– नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम सुरु करणार आहात का?
: मुक्त शिक्षणाला कोणतेही बंधन नाही. भारतभर पंतप्रधान नरेंद्र मोदींची कुसुम सौरपंप योजना राबविली जाणार आहे. देशभर लाखोंच्या संख्येने सौरऊर्जेवर आधारित सौरपंप बसविले जाणार आहेत. त्या पंपाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची गरज भासणार आहे. ज्यावेळी वीज नव्हती त्यावेळी वायरमनही नव्हते. पण जशी वीज आली तशी वायरमनची गरज भासू लागली. उदयोभिमुख क्षेत्रामध्ये जी सेवा लागते. त्या सेवेसाठी मुक्त विद्यापीठ कौशल्यप्राप्त मनुष्यबळ तयार करणार आहे. उद्योगांबरोबर सहकार्य करून ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. अशी अनेक क्षेत्रात खुणावत आहेत. नवीन क्षेत्रांसाठी जी मनुष्यबळाची गरज भासेल ती उपलब्ध करून देणे हे मुक्त विद्यापीठाचे उद्दिष्ठ्य आहे.

– मुक्त विद्यापीठातील मनुष्यबळाची समस्या कशी सोडविणार आहात?
: मुक्त विद्यापीठातील कर्मचार्‍यांच्या संख्येचा विषय तात्काळ सोडविला जाणार आहे. आगामी चार महिन्यांत रिक्त ५० टक्के पदे भरली जातील. त्यामुळे मुक्त विद्यापीठाला नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी उपयोगी पडेल.

– पीएच.डी. दर्जा वाढविण्यासाठी काय करणार आहात?
: विद्यापीठ अनुदान आयोगालची पार्टटाईम पीएच. डी. ला परवानगी मिळाल्यानंतर डॉक्टरेटसाठी संशोधन करता येणार आहे. तर मुक्त विद्यापीठातून पीएच. डी. प्राप्त केलेला विद्यार्थी समाज उपयोगी असेल. त्यातून समाजाचे प्रश्न सुटतील. तसे संशोधन प्रकल्प असतील तरच त्यांना मान्यता दिली जाणार आहे अन्यथा दिली जाणार नाही.