घरमहाराष्ट्रना ठाकरे, ना मविआ... महिनाभर सर्व शांत... निलेश राणेंच्या महिनाभरातील ट्वीटची चर्चा

ना ठाकरे, ना मविआ… महिनाभर सर्व शांत… निलेश राणेंच्या महिनाभरातील ट्वीटची चर्चा

Subscribe

'राष्ट्रीय टोमणा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...' देणारे भाजपा नेते निलेश राणे आजकाल कुठेच चर्चेत नाहीत. सोशल मीडियावर पूर्णपणे active असताना देखील त्यांनी गेले महिनाभर कोणतेही वादग्रस्त ट्वीट केलेले नाही. शिवाय, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर तसेच ठाकरे गटाच्या नेत्यांबद्दल टीकेचे अवाक्षरही काढलेले नाही, त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई : ‘राष्ट्रीय टोमणा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…’ देणारे भाजपा नेते निलेश राणे आजकाल कुठेच चर्चेत नाहीत. सोशल मीडियावर पूर्णपणे active असताना देखील त्यांनी गेले महिनाभर कोणतेही वादग्रस्त ट्वीट केलेले नाही. शिवाय, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर तसेच ठाकरे गटाच्या नेत्यांबद्दल टीकेचे अवाक्षरही काढलेले नाही, त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन पुत्र निलेश आणि आमदार नितेश हे कायम उद्धव ठाकरे, त्यांचा मुलगा आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गट तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कायम तोंडसुख घेत आले आहेत. लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावाच्या वेळी भाषण करताना नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या खासदारांची थेट ‘औकात’च काढली होती. तर, दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील सहारा हॉटेलमध्ये आयोजित एका पुस्तकप्रकाशन सोहळ्यात ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’च्या हप्तावसुलीचा आरोप केला होता. (Nilesh Rane has not criticized Thackeray or MVA through tweets in a month)

हेही वाचा – जालन्याच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर, म्हणाले – “…तर तुम्हाला…”

- Advertisement -

भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील वारंवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी अलीकडेच सनातन धर्मावर वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले. त्यावरून, नितेश राणे यांनी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असल्याचे जे सांगत फिरतात, ते उद्धव ठाकरे या सनातन धर्मावरील आक्रमणाबाबत बोलण्याची हिम्मत दाखवणार का? असे थेट आव्हान दिले होते.

निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. ओडिशातील बालासोर जिल्ह्यात जूनमध्ये झालेल्या रेल्वे अपघातप्रकरणी शरद पवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा राजीनामा मागितला होता. त्यावर ट्वीट करताना निलेश राणे यांनी, हाच जर निकष असेल तर, आपण कृषीमंत्री असताना हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, आपण तर राजकारणातून कधीच संन्यास घ्यायला हवा होता, असे म्हटले होते.
तर, 5 ऑगस्ट 2023 रोजी नितेश राणे विरोधी पक्षनेतेपदाबद्दल त्यांनी ट्वीट केले होते. ‘नियती कशी असते… 2019ला महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा काँग्रेस पक्षाचे सर्वात कमी आमदार निवडून आल्यामुळे सत्तेत त्यांना तुसडेपणाची वागणूक मिळाली. आज उबाठा आणि शरद पवार NCP रसातळाला गेल्यामुळे आज विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही LOP पदे काँग्रेसकडे गेली. आज काँग्रेसला त्या दोघांची गरज नाही,’ असे त्यांनी म्हटले होते. पण त्यानंतर आजच्या तारखेपर्यंत त्यांनी कोणतेही असे विरोधकांवर टीका करणारे ट्वीट केलेले नाही. या महिनाभरात त्यांनी जवळपास 100 ट्वीट केले. त्यात त्यांचे सुमारे 60 ट्वीट असून इतर ट्वीटमध्ये सर्वाधिक उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस, त्याखालोखाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट रीट्वीट केले आहेत. त्यामुळे हा अचानक बदल कसा झाला? भाजपा पक्षश्रेष्ठींकडून तशा सूचना आल्या आहेत का? असे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -