घर ताज्या घडामोडी BJP Maharashtra: राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, भाजपच्या आमदाराचा दावा

BJP Maharashtra: राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, भाजपच्या आमदाराचा दावा

Subscribe

भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेबाबत (ठाकरे गट) मोठा दावा केला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवतील, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणेंच्या (Nitesh Rane) या दाव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

नीतेश राणे यांनी ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही म्हटले आहे. उद्धव ठाकरेंना वर्षभरात नवीन पक्ष काढणे शक्य नाही. आगामी निवडणुकीत कोणत्याही पक्षाचे चिन्ह असणार नाही. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार, आमदार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं आमदार नितेश राणे म्हणाले.

राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राणेंंकडून प्रत्युत्तर

- Advertisement -

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये मोदी सरकारचे ९ वर्षे म्हणजे नाकीनऊ आणणारी आहेत, असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रत्युत्तर देत नितेश राणे म्हणाले की, कदाचित संजय राऊत विसरले असतील या ९ वर्षांत २०१४ ते १९ ही ५ वर्षे ते एनडीएचे भाग होते. मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांचे मंत्री होते. तर राऊतांच्या मालकांचे आणि सगळे लाड हे मोदी सरकारच्या मार्फत पुरविले जात होते. त्यांचा मालक जो आमदार म्हणून सगळीकडे मिरवतोय, या आमदारकीचा राजीनामा देणार असे बोलला आणि राजीनामा देत नाही. ही आमदारकी देखील त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने मिळाली आहे.

राणेंच्या दाव्यावर ठाकरे गटाचा पलटवार

नितेश राणेंनी किती दिवसांसाठी आपला पक्ष विलीन केला याचा इतिहास पाहावा. ईडीच्या भीतीने त्यांनी काँग्रेस सोडली आणि स्वतःचा पक्ष काढला. पण त्यांना आपल्याच पक्षाचा आमदार निवडून आणता आला नाही. ते उद्धव ठाकरेंच्या पक्षाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे यांनी अनेक आमदार दिले आहेत. हे आमदार गेले असले तरी दुसरी फळी तयार झाली आहे. पक्षाचे आमदार, खासदार गेले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची लोकप्रियता वाढत आहे, असा पलटवार ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.


- Advertisement -

हेही वाचा : Sanjay Raut : मोदी सरकारची नऊ वर्षं देशाला नाकीनऊ आणणारी, राऊतांची टीका


 

- Advertisment -