घरमहाराष्ट्र'बुद्धिस्‍ट सर्कीट'मुळे जगातील पर्यटकांना बुद्धांच्या जीवनाची माहिती कळणार - नितीन गडकरी

‘बुद्धिस्‍ट सर्कीट’मुळे जगातील पर्यटकांना बुद्धांच्या जीवनाची माहिती कळणार – नितीन गडकरी

Subscribe

'ड्रॅगन पॅलेसमध्‍येसुध्‍दा बुद्धिस्ट राष्‍ट्रांतून येणाऱ्या पर्यटकांना बुद्‌धांच्‍या जीवनाची माहिती कळण्‍यासाठी सिंगापूरच्‍या लाईट आणि साउंड शो प्रमाणे एक 'वर्ल्‍ड प्राईड सेंटर ऑफ बुद्धिझम' हा प्रकल्‍प स्‍थापन करण्‍यासाठी महाराष्‍ट्र शासनाने केंद्रीय पर्यटन मंत्रालयास एक प्रकल्प प्रस्ताव पाठविला आहे. या प्रकल्पामुळे ड्रॅगन पॅलेस हे केवळ भारतातच नव्हे तर जगात विख्यात होईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

गौतम बुद्धांच्‍या जीवनातील महत्‍वाची स्‍थळे लुंबिनी, बोधगया, सारनाथ, कुशीनगर हे ‘बुद्धिस्ट सर्कीटच्‍या’ माध्‍यमातून जोडल्‍यामुळे जागतिक पर्यटकांना या स्‍थळांना भेट देता येईल आणि बुद्‌धांच्‍या जीवनाची माहिती जाणून घेता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्‍ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात ओगावा सोसायटीच्‍या वतीने आयोजित आंतरराष्‍ट्रीय बुद्धिस्ट शांतता परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते विशेष अतिथी म्‍हणून बोलत होते.

‘ड्रॅगन पॅलेस हे केवळ भारतातच नव्हे तर जगात विख्यात होईल’

उत्‍तर प्रदेश आणि बिहार राज्‍यातील गौतम बुद्धधांच्‍या जीवनाशी संबंधित स्‍थळांना ४ लेन आणि ६ लेन कॉंक्रीटच्‍या रस्‍त्‍यांनी जोडण्‍याचे सुमारे १० हजार कोटीच्‍या प्रकल्‍पाचे काम पुढील २ वर्षात पूर्ण होणार असल्‍याची माहिती गडकरी यांनी दिली. ‘ड्रॅगन पॅलेसमध्‍येसुध्‍दा बुद्धिस्ट राष्‍ट्रांतून येणाऱ्या पर्यटकांना बुद्‌धांच्‍या जीवनाची माहिती कळण्‍यासाठी सिंगापूरच्‍या लाईट आणि साउंड शो प्रमाणे एक ‘वर्ल्‍ड प्राईड सेंटर ऑफ बुद्धिझम’ हा प्रकल्‍प स्‍थापन करण्‍यासाठी महाराष्‍ट्र शासनाने केंद्रीय पर्यटन मंत्रालयास एक प्रकल्प प्रस्ताव पाठविला आहे. या प्रकल्पामुळे ड्रॅगन पॅलेस हे केवळ भारतातच नव्हे तर जगात विख्यात होईल. यासाठी या अहवालास मंजुरी देऊन या प्रकल्‍पाच्‍या निर्मितीस केंद्रीय पर्यटन मंत्र्यानी सहकार्य करावे’, असे गडकरी यांनी यावेळी सुचविले. ड्रॅगन पॅलेसपर्यंत येण्‍यासाठी आता पुढील काळात मेट्रोचे स्‍टेशन निर्माण होणार असून त्‍यांची संरचनाही ड्रॅगन पॅलेस सारखीच राहील, अशी माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

निधीची मागणी केली की त्वरित मंजूर करु – के.जे. अल्‍फॉन्‍स

ड्रॅगन पॅलेसच्‍या ‘वर्ल्‍ड प्राईड सेंटर ऑफ बुद्धीझम’ या प्रकल्‍पासाठी सुमारे १०० कोटीच्या निधी प्रकल्‍पाचा डी. पी. आर. (सविस्तर प्रकल्प अहवाल)‌ राज्‍य शासनाने आपल्या मंत्रालयास पाठविल्‍यास आपण तो त्‍वरित मंजूर करू, असे आश्‍वासन केंद्रीय पर्यटन राज्‍यमंत्री के.जे. अल्‍फॉन्‍स यांनी यावेळी दिले. जागतिक पर्यटन क्षेत्रात ५ टक्के वाढ होत असताना भारतीय पर्यटन क्षेत्रात १४ टक्‍के वाढ होत असल्‍याच्‍या बाबीचा त्‍यांनी विशेष उल्‍लेख केला.

नागपूर-कन्‍हान-कामठी हा प्रकल्प ६ महिन्‍यात पूर्ण होणार – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर-कन्‍हान-कामठी हा ३०० कोटी रूपयाचा रस्‍ता ६ महिन्‍यात पूर्ण होणार असल्‍याचे सांगितले. नागपूर मेट्रो ड्रॅगन पॅलेसपर्यंत येणार असून मेट्रोचे ६ स्‍टेशन्‍स कामठीत राहतील, अशी माहितीही त्‍यांनी यावेळी दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बुद्धिस्ट माहिती पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले. ड्रॅगन पैलेस या वास्तूला भेट देण्यासाठी राज्याच्या आणि देशाच्या विविध भागातून आलेले भाविक, बुद्धिस्ट राष्ट्रांच्या भिक्खू संघाचे प्रतिनिधी ,ओगावा सोसायटीचे पदाधिकारी या परिषदेत मोठ्या संख्येने उपास्थित होते.

हेही वाचा – गौतम बुद्धाच्या पवित्र भूमीत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -