घरमहाराष्ट्रगृहखात्यावरून गृहकलह!

गृहखात्यावरून गृहकलह!

Subscribe

एका बाजूला ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग यासारख्या केंद्रीय यंत्रणा शिवसेना नेत्यांच्या मागे हात धुवून लागलेल्या असताना राज्याच्या गृहखात्याकडून भाजपच्या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई होत नसल्याने शिवसेनेकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच गृहखाते शिवसेनेकडे घ्यावे, अशी मागणी शुक्रवारी शिवसेनेच्या नाराजीतून पुढे आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या नव्या वादाला तोंड फोडल्याने आघाडीतील गृहकलह वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवसभरात दोनदा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना वर्षावर पाचारण करून त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी वळसे-पाटील हे सक्षमपणे काम करीत असून त्यांच्याविषयी कोणतीही नाराजी नसल्याचे सांगत माध्यमांतील बातम्यांचे खंडन केले. तर दिलीप वळसे-पाटील गृहखाते उत्तमपणे सांभाळत आहेत, असा निर्वाळा शिवसेना नेते संजय राऊत यांनी देत नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

गृहखात्याने अधिक सक्षम झाले पाहिजे. यासंदर्भात आपण गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात येऊन कारवाया करत असून हे गृहखात्यावर आक्रमण आहे. या प्रकाराकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. आस्ते कदम भूमिका कोणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी शिवसेनेची नाराजी उघड केली होती. गृहखात्यालाच दमदार पावले टाकावी लागतील. नाहीतर तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल, असा इशारा देत राऊत यांनी शिवसेनेतील खदखद माध्यमांसमोर व्यक्त केली. त्याचवेळी शिवसेनेकडून गृहखात्याचीही मागणी सुरू करण्यात आल्याने महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला.
त्यानंतर गृहकलह वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवसभरात दोनदा दिलीप वळसे- पाटील यांना वर्षावर पाचारण करून त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी वळसे-पाटील हे सक्षमपणे काम करीत असून त्यांच्याविषयी कोणतीही नाराजी नसल्याचे सांगत माध्यमातील बातम्या खोडून काढल्या.

- Advertisement -

केंद्रीय तपास यंत्रणांनी आतापर्यंत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना तुरुंगात टाकले आहे. याशिवाय महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडी आणि आयकर विभागाचे धाडसत्र सुरू आहे. आतातर या यंत्रणांनी उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले आहे. मात्र, राष्ट्रवादीकडे असलेले गृहखाते भाजप नेत्यांच्या विरोधात तक्रारी असतानाही कारवाई करत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्यास दिलीप वळसे- पाटील हे आस्ते कदम टाकत आहेत असा शिवसेनेचा आक्षेप आहे.

संजय राऊत यांनी परिषद घेऊन किरीट सोमय्या पिता-पुत्र लवकरच जेलमध्ये जाणार अशी घोषणा केली होती. त्यासंदर्भात त्यांनी तक्रारी देऊनही किरीट आणि नील सोमय्या यांच्याविरोधात पोलीस यंत्रणांनी कोणतेही कारवाईचे पाऊल टाकले नाही. त्यामुळे संजय राऊत नाराज आहेत. या नाराजीतून त्यांनी वळसे-पाटील यांच्याविषयी आपली नाराजी उघड केली. राऊत यांच्या आरोपांनी आघाडीत वादाची ठिणगी पडली. मात्र, हा वाद पेटू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पावले टाकत सारवासारव केली. त्यांनी दिलीप वळसे-पाटील यांच्याशी दीड तास स्वतंत्र चर्चा केल्यानंतर त्यांची संजय राऊत यांच्याशीही वर्षावरच बैठक घडवून आणत या वादावर पडदा टाकला. त्यानंतर राऊत यांनी वाद -विवादातूनच राज्य चालत असते. आमच्यात कोणतीही नाराजी नाही. दिलीप वळसे-पाटील हे उत्तम गृहमंत्री आहेत, असा खुलासा संजय राऊत यांनी केला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांचा खुलासा

गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांतून येत आहेत. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त आहेत. माझा माझ्या सहकार्‍यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करीत आहेत, असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचा दावा

गृह खात्यावरून आघाडीत उलटसुलट चर्चा सुरू असताना भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चेला वेगळे वळण दिले. राष्ट्रवादी मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाच्या अदलाबदलीची शक्यता असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना केला.
शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडून गृहमंत्रीपद मागितले जात आहे. हे ऐकूनच मला आश्चर्य वाटले. मुख्यमंत्र्यांना सर्व मंत्र्यांचे अधिकार असतात. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असून त्यांना कोणतेही खाते ठेवण्याची गरज नाही. सर्व खाती त्यांच्या नियंत्रणात असतात. राष्ट्रवादीकडूनही कधीतरी खासगीत आम्हाला मुख्यमंत्रीपद हवे असल्याची चर्चा सुरू असते. आता कदाचित त्यांच्यात अदलाबदल होणार असेल तर माहिती नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. राष्ट्रवादीला गृहमंत्रीपद भाजपवर सूड उगवण्यासाठी हवे आहे. जनतेची सेवा करण्यासाठी, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हे पद नको. याच सूड भावनेतून राज्याचा एक राजकीय पक्ष भाषा करत असेल तर आश्चर्य आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे हवे, असे मत व्यक्त केले आहे, गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असेल तर राज्याला नवी दिशा मिळेल, असेही ते म्हणाले.

‘मुख्यमंत्री आपल्या विभागावर नाराज नाहीत. संजय राऊत यांची भावना बरोबर आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण काम करणार असून जर गृहखात्याकडून काही कमतरता राहिली असेल तर त्यावर सुधारणा केली जाईल.’
-गृहमंत्री, दिलीप वळसे-पाटील

‘दिलीप वळसे-पाटील हे एक उत्तम गृहमंत्री आहेत आणि ते निश्चितपणे चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. आघाडी सरकारमध्ये एकमेकांच्या भावना समजून घेऊन काम करावे लागते. वळसे-पाटील यांनी आपल्या भावना समजून घेतल्या आहेत.’
-शिवसेना नेते, संजय राऊत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -