घरमहाराष्ट्रगणेशोत्सव स्पेशल - आता ६० दिवस आधी मिळणार एसटीचे आरक्षण

गणेशोत्सव स्पेशल – आता ६० दिवस आधी मिळणार एसटीचे आरक्षण

Subscribe

गणेशोत्सव निमित्ताने एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी नवी सुविधा सुरु केली आहे. प्रवासी आता ६० दिवसांअगोदर एसटीचे आरक्षण करु शकतात. त्यामुळे प्रवाशांना जाण्याचे आणि येण्याचे दोन्ही बाजूचे आरक्षण करता येणार आहे.

गणपती उत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता एकाचवेळी जातानांचे आणि परत येतानांचे आरक्षण करणे शक्य होणार आहे. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रवाशांना ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली आहे. या सुविधेचा लाभ महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना होणार आहे.

२२०० जादा बसेसची सुविधा

एसटी महामंडळाने यंदा मुंबई उपनगरातून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित बसेस व्यतिरिक्त २२०० जादा बसेसची सोय केली आहे. या बसचे आरक्षण २७ जुलै (२६ जुलैच्या मध्यरात्रीपासून) सुरु होणार आहे. यंदा पहिल्यांदाच प्रवाशांना जाता-येताचे एकत्रित आरक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिली आहे. (यापूर्वी ती ३० दिवस होती) साहजिकच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याला परतीच्या आरक्षणासाठी तिथल्या बसस्थानकावर ताटकळत उभे राहण्याची आता आवश्यकता राहणार नाही. २७ तारखेपासून सुरु होणाऱ्या या आरक्षण सुविधेमुळे जाण्याबरोबर परतीचे आरक्षण सुद्धा मिळाल्यामुळे त्यांचा गणपती उत्सवाचा आनंद द्विगुणित होणार आहे.

- Advertisement -

ऑनलाईनही करता येईल आरक्षण

आरक्षण संदर्भातील बदल संगणकाच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये करण्यासाठी आरक्षण प्रक्रिया २६ जुलै रोजी संध्याकाळी ४:०० ते मध्यरात्री १२:३० पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण तिकिट काढणे अथवा रद्द करणे, ही प्रक्रिया करता येणार नाही. २६ तारखेच्या मध्यरात्रीपासून सुधारित आरक्षण प्रणाली आरक्षणासाठी उपलब्ध असणार आहे. तरी सदर बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले आहे.


हेही वाचा – एसटी बसगाड्यांतील मोफत इंटरनेट सुविधा कोलमडली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -