Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र एक खुर्ची, दोन नेते! विखे-शिंदे वादावर फडणवीसांनी 'असा' काढला तोडगा

एक खुर्ची, दोन नेते! विखे-शिंदे वादावर फडणवीसांनी ‘असा’ काढला तोडगा

Subscribe

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे दोन ज्येष्ठ नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांच्यात काही दिवसांपूर्वी वादाची ठिणगी उडाली होती. राम शिंदे यांच्याकडून याप्रकरणी पक्षाकडे तक्रारही करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. (Fadnavis took solution to Vikhe-Shinde dispute)

देवेंद्र फडणवीस आज नगर दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमत राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे एकत्र दिसून आले. त्यामुळे या दोघांमध्ये पुन्हा वाद होतो का असे वाटत असताना देवेंद्र फडणवीस यांनी दोघांना बाजूला आपल्या बाजूला समान स्थान दिल्याचे दिसून आले. पत्रकारांनी दोघांच्याही वादाबाबत फडणवीस यांना विचारले असता त्यांनी वक्तव्य केले की, या दोघांमध्ये वाद असले तरी वादळ नाही. हे पेल्यातील वादळ आहे आणि ते लवकरच विरून जाईल. म्हणूनच आज दोघांनाही सोबत घेऊन बसलो आहे, असे म्हणत फडणवीस यांनी विखे पाटील आणि राम शिंदे यांच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करताना दिसले.

- Advertisement -

भूमिपूजन कार्यक्रमात खुर्चीचा किस्सा रंगला
सरकारी विश्रामगृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमात राम शिंदे भाजपचे नेते असल्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ खुर्चीची व्यवस्था करण्यात आली नव्हती. परंतु पालकमंत्री विखे पाटील फडणवीस यांच्या बाजूला आणि त्यांचा पुत्र सुज विखे पाटील यांची पहिल्या रांगेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. राम शिंदे जेव्हा व्यासपीठावर आले, तेव्हा त्यांना बसण्यासाठी खुर्चीची व्यवस्था नाही हे फडवणीस यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वत:ची खुर्ची सरकवत राम शिंदे यांना देण्याचा प्रयत्न केला. फडणवीस स्वत: खुर्ची देत असल्याचे यंत्रणेच्या लक्षात आले आणि त्यांनी राम शिंदे यांच्यासाठी फडणवीस यांच्या बाजूलाच खुर्ची आणून ठेवली. त्यानंतर पुढील सर्व कार्यक्रमांत फडणवीस या दोन्ही नेत्यांना सोबत घेऊन बसल्याचे पाहायला मिळाले.

विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यात वाद कधीपासून
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. या निवडणुकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात छुपी युती असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला होता. यावेळी त्यांनी विखे पिता-पुत्र ज्या पक्षात जातात, त्या पक्षाच्या विरोधात काम करतात, असा आरोप करताना वरिष्ठांकडे तक्रार केल्याचे म्हटले होते. मात्र विखे पाटील यांनी छुप्या युतीचा आरोप फेटाळून लावत राम शिंदे यांचा गैरसमज झाल्याचे म्हटले होते. मात्र हा वाद अजूनही मिटलेला नाही. त्यामुळे विखे पाटील यांनी आयोजित केलेल्या पक्षाच्या कार्यक्रमातही शिंदे सहभागी होत नसल्याचे दिसून आले होते.

- Advertisement -

 

- Advertisment -