घरमहाराष्ट्रखोट बोला पण रेटून बोला, हे महाआघाडी सरकारचे धोरण

खोट बोला पण रेटून बोला, हे महाआघाडी सरकारचे धोरण

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

देशातले सगळ्यात जास्त रुग्ण ज्या राज्यात आहेत त्या सरकारमधले मंत्री स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला मित्र कोण आणि शत्रू कोण हे चांगलंच माहित आहे, असे सांगताना ‘खोटे बोल पण रेटून बोल’ हे महाविकास आघाडी सरकारचे धोरण असल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सरकारला आम्ही मदतच करत आहोतच पण सरकारच्यावतीने फेकाफेक केली जात असेल तर त्याचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल, असेही त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रावर निशाणा साधल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी मांडलेल्या एक एक मुद्द्यांची अक्षरशः चिरफाड केली आहे. ऑनलाईन पत्रकार परिषद घेत फडणवीस म्हणाले की, पीपीई किट्स मिळाले नाही म्हणून सांगतात, पण यासंदर्भातला डायनामिक डॅशबोर्ड आहे, त्या डॅशबोर्डवर पीपीई किट्स कुठल्या राज्याला देण्यात आले याबाबतची माहिती देण्यात आलेली असते. २६ मेपर्यंत महाराष्ट्राला ९ लाख ८८ हजार म्हणजे जवळजवळ १० लाख पीपीई किट्स दिल्या आहेत. तसेच १६ लाख एन ९५ मास्क दिले आहेत. ४६८ कोटी रुपये हे केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

अनिल परब विचारत आहेत की गहू कुठे आहेत? गहू आम्हाला मिळाला नाही. मी कालदेखील हेच सांगितलं की २ रुपये किलो आणि ३ रुपये किलो हा जो गहू तुम्ही अन्न सुरक्षे अंतर्गत देत आहात तो केंद्र सरकारने दिलेलाच गहू आहे. २४ रुपये आणि ३२ रुपये किलोने घेतलेला हा गहू आहे. तरीही हा गहू कुठे आहे असा प्रश्न परब यांना का पडला हे मला समजत नाही. एका ट्रेनचा खर्च ५० लाख रुपये हा मी ठरवलेला नाही तर रेल्वे मंत्र्यांनी तो घोषित केलेला खर्च आहे तुम्हाला एका ट्रेनसाठी ७ ते ९ लाख रुपये खर्च येतो तर रेल्वे मंत्रालयाला तो खर्च ५० लाख रुपये येतो, असे फडणवीस म्हणाले.

मुंबईत टेस्टची संख्या कमी करण्यात आली आहे. देशात टेस्ट केल्यानंतर एकूण पाच टक्के रुग्ण पॉझिटिव्ह निघतात आणि महाराष्ट्रात ते १३ ते साडेतेरा टक्के पॉझिटिव्ह रुग्ण सापडतात. मे महिन्यात त्याचे प्रमाण ३२ टक्के करण्यात आले आहे. मग कशाच्या आधारावर आपली पाठ थोपटण्याचे काम ठाकरे सरकारच्यावतीने चालले आहे. हे मला खरोखरंच समजत नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

- Advertisement -

केंद्राकडून पैसे मिळालेले असतानाही केंद्राकडून काही येत नाही, असे सांगू नका. केंद्र सरकारकडून जीएसटीचे पैसे नोव्हेंबर आणि डिसेंबरपर्यंत पूर्ण आलेले आहेत. डिसेंबर ते मार्चपर्यंतच्या पैशांचा निर्णय जीएसटी काऊन्सिल घेते आहे. त्यामुळे खोट बोल पण रेटून बोल असा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो आहे. अशा प्रकारच्या एकत्रित पत्रकार परिषदा घेण्याऐवजी मुंबईत लोकांना अ‍ॅम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे लोकांचा मृत्यू होतोय, त्यासंदर्भात तुम्ही काय करणार आहात ते सांगा, असे आव्हानच देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधार्‍यांना दिले. आहे. मुंबईत लोकांचे टेस्टिंग होत नाही, यासंदर्भात काय करणार आहोत ते सांगा. केवळ फेकाफेक करायची आणि खोटी आकडेवारी द्यायची यानं महाराष्ट्राचं भलं होणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेला त्यांचा मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्टपणे माहीत आहे. सरकारला मदत करायची आजही आमची भूमिका आहे. पण अशा प्रकारे सरकारकडून फेकाफेक केली जात असेल, तर त्याचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

देशातील ३३ टक्के रुग्ण ज्या राज्यात आहेत. देशातील ४० टक्के मृत्यू ज्या राज्यात झालेले आहेत. त्या राज्याचे मंत्री आपली पाठ थोपटून घेत आम्ही कसं उत्तम काम करतोय हे सांगत असल्याची टीकाही फडणवीसांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -