घरमहाराष्ट्रमारहाणप्रकरणी १६ पोलिसांवर कारवाईचे आदेश

मारहाणप्रकरणी १६ पोलिसांवर कारवाईचे आदेश

Subscribe

गेल्यावर्षी सांगली जिल्ह्यात पोलीस ठाण्यात झालेल्या अनिकेत कोथळे याच्या हत्याकांडाची खबर ताजी असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात अशाच प्रकारची घटना समोर आली. चंदगडच्या हेरे गावात राहणारे रमाकांत गावडे यांना चंदगड पोलिसांनी मारहाण आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी त्यांनी पोलिसांविरुद्ध बंड पुकारले होते. मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत त्यांनी उपोषण करून अन्याय करणार्‍या सर्व पोलीस अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली होती. एप्रिल २०१८ मध्ये चंदगड न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करत रमाकांत गावडे यांच्यावर अन्याय करणार्‍या पोलीस ठाण्यातील १६ पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र, अद्यापही या पोलीस अधिकार्‍यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.

रमाकांत गावडे चंदगडच्या हेरे गावातले रहिवासी आहेत. गावडे यांचे त्यांच्या आई-वडिलांसोबत वारंवार भांडण होत होते. या सगळ्या प्रकाराला कंटाळून वडिलांनी रमाकांत यांच्याविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, यानंतर त्यांना चंदगड पोलिसांच्या भयानक वृत्तीला तोंड द्यावे लागले. पोलिसांनी या प्रकरणाचा फायदा उचलत त्यांना अमानुषपणे मारहाण केली, असा त्यांनी आरोप केला होता. मारहाण झाल्यानंतर रमाकांत गावडे यांनी वैद्यकीय चाचणीसाठी चंदगडच्या सरकारी हॉस्पिटलातही धाव घेतली, मात्र तिथेही त्यांना कोणी समजून न घेता पोलिसांच्या दबावाखाली डॉक्टरांनी वैद्यकीय चाचणीच्या रिपोर्टमध्ये कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचे स्पष्ट केले. या सगळ्या प्रकारानंतर रमाकांत गावडे यांनी ही लढाई कायदेशीर मार्गाने लढायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली. यापूर्वी त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानातही अन्याय करणार्‍या पोलिसांवर कारवाई व्हावी यासाठी उपोषण केले होते.

- Advertisement -

एप्रिल २०१८ मध्ये चंदगड कोर्टाने याप्रकरणी न्याय दंडाधिकारी एम.डी. ठोंबरे यांनी याबाबत आदेश दिले होते. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी या १६ पोलीस अधिकार्‍यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची चौकशी केली नसल्याचा आरोप गावडे यांनी केला आहे. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख हे या १६ पोलीस अधिकार्‍यांना या प्रकरणापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असून, त्यामुळेच त्यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले नसल्याचा आरोप रमाकांत गावडे यांनी केला आहे.

अमृत गावडेही चंदगड पोलिसांचा बळी
चंदगडच्या पार्ले गावात राहणारा अमृत गावडे हा तरुणदेखील चंदगड पोलिसांच्या अन्यायाला बळी पडला आहे. कोल्हापूर येथे एमपीएससीची तयारी करत असलेल्या अमृत गावडे यालासुद्धा पोलिसांनी अमानुष मारहाण केली असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी अमृत गावडे याने मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार केला असून, या प्रकरणातसुद्धा दिरंगाई होत असल्याचा आरोप त्याने केला आहे. अमृत गावडे याच्या मोबाईलवर चंदगड पोलीस ठाण्याच्या एका अधिकार्‍याने फोन करून अश्लील शिवीगाळ केल्याची एक क्लिपसुद्धा त्याच्याकडे आहे. पण, अद्याप याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. गेल्या काही वर्षांमध्ये चंदगड पोलीस ठाण्यातल्या अधिकार्‍याची भूमिका संशयास्पद दिसून येत असून, रमाकांत गावडे आणि अमृत गावडे या दोन प्रकरणांमध्ये चंदगड पोलिसांचा क्रूर चेहरा समोर आला आहे.

- Advertisement -

‘त्या’ पोलीस अधिकार्‍यांची नावे
रमाकांत गावडे यांना मारहाण करून लैंगिक अत्याचार करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांमध्ये चंदगड पोलीस निरीक्षक महावीर सकळे, पोलीस शिपाई संग्राम जिवबा पाटील, पोलीस शिपाई हणमंत चौगुले, पोलीस शिपाई सागर आनंदा पाटील, पोलीस शिपाई शैलेष शिंदे यांच्यासह इतर ११ पोलीस शिपायांचा समावेश आहे.

या प्रकरणाबद्दल मला जास्त माहिती नाही. पण, चंदगड न्यायालयाने १६ पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यावर सत्र न्यायालयातून स्थगिती मिळवण्यात आली आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा होणे अद्याप बाकी आहे.
-अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -