Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'महावसूली सरकार'ने जनतेला बनवले एप्रिल फूल; केशव उपाध्येंची टीका

‘महावसूली सरकार’ने जनतेला बनवले एप्रिल फूल; केशव उपाध्येंची टीका

चांदीवाल चौकशी समिती म्हणजे केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून एप्रिल फूल बनवण्याचा प्रकार आहे.

Related Story

- Advertisement -

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी चांदीवाल चौकशी समिती स्थापन करून राज्य सरकारने १ एप्रिलच्या दोन दिवस आधीच जनतेला एप्रिल फूल बनवले आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. उपाध्ये यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पाठवलेल्या पत्राला अनेक दिवस उलटले तरी सरकार ढिम्मच होते. मात्र, उच्च न्यायालयात याचिकेची सुनावणी होणार हे दिसल्यानंतर राज्य सरकारने बुधवारी कैलास चांदीवाल समिती स्थापन केली. ही समिती, चौकशी आयोग अधिनियम, १९५२ अंतर्गत नेमलेली नाही. त्यामुळे या समितीला कोणालाही नोटीस बजावण्याचा अधिकारच नाही. तसेच समितीकडून संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावल्यावर उपस्थित राहीलेच पाहिजे असे बंधनही नसेल. त्यामुळे ही समिती म्हणजे केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून एप्रिल फूल बनवण्याचा प्रकार आहे, असे उपाध्ये म्हणाले.

निःष्पक्ष चौकशीची खात्री नाही 

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा गृहमंत्र्यांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे या विभागाकडे परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सोपवली, तर ती निःष्पक्ष असेल याची खात्री नाही. ज्याप्रमाणे महावसूली सरकारने मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडून फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल जसा हवा, तसा तयार करून घेतला, त्याचप्रमाणे आता या चांदीवाल समितीकडून सुद्धा आपल्याला हवा, तसा अहवाल तयार करून घेतला जाण्याची शक्यता आहे, असेही उपाध्ये म्हणाले.

नक्की कोणाचे पित्त खवळले हे स्पष्ट

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काही दिवसांपूर्वी भेट झाल्याचे वृत्त आहे. मात्र, अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते. याबाबत उपाध्ये यांना विचारले असता त्यांनी सांगितले, ही भेट झाली की नाही याविषयी भाजपकडून कुठलेच वक्तव्य केलेले नाही. या विषयावर सुरूवातीपासून कोण बोलत आहे आणि राज्य सरकार किती ठाम आहे याविषयी वारंवार कोणाला सांगत रहावे लागले? त्यामुळे नक्की कोणाचे पित्त खवळले, हे स्पष्ट आहे.

- Advertisement -