घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगुजरात महामार्गावर टोलनाका सुरू होण्याआधीच पोलिसांचा "टोल"; पोलिसांच्या धाकाने पर्यटकांची संख्या रोडावली

गुजरात महामार्गावर टोलनाका सुरू होण्याआधीच पोलिसांचा “टोल”; पोलिसांच्या धाकाने पर्यटकांची संख्या रोडावली

Subscribe

नाशिक : महाराष्ट्र व गुजरात राज्याला जोडणार्‍या 953 या राष्ट्रीय महामार्गावरील पांडाणे येथील राष्ट्रीय महामार्गावरील अधिकृत टोलनाका सुरु होण्यापुर्वीच पोलिसांचा तपासणी नाका सुरु केला आहे. पोलिसांकडून वाहनचालकांची कागदपत्रांच्या नावाखाली अडवणूक केली जात आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होत असून, वाहनचालक, प्रवाशांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे.

महाराष्ट्र व गुजरात राज्यातील दळणवळणासाठी सूरत-शिर्डी या राष्ट्रीय महामार्गाची पूर्तता करण्यात आली. हा मार्ग प्रवासासाठी सुखकर झाल्याने गुजरात व महाराष्ट्रात ये-जा करणार्‍या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यात सप्तशृंगगड, नाशिक, त्रंबकेश्वर, शिर्डी, शिंगणापूर या ठिकाणी गुजरातमधील पर्यटक येथे जात आहेत. सापुतारा, बोरगावनंतर जाताना पांडाणे या ठिकाणी राष्ट्रीय माहामार्गाचा अधिकृत टोलनाका येतो. हा टोलनाका सध्या सुरु करण्यात आलेला नाही. मात्र, टोलनाका परिसरात पोलिसांनी तपासणी नाका सुरु केला आहे. गुजरातमधे येणार-जाणारी वाहने तपासणी करणे, महाराष्ट्रातील दुसर्‍या जिल्ह्यातील वाहने अडवून तपासणी करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, वाहनचालकांना ताटकळत ठेवणे, कागदपत्रे असतानाही अकारण वाहने रस्त्यावर उभी करण्यास भाग पाडणे अशा प्रकारामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

- Advertisement -

पांडाणे टोलनाका परीसरात रस्त्यावर वाहने अडविल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या मार्गावरुन ये-जा करणार्‍या व्यावसायिक, उद्योजक, शेतकरी, कामगारांना नाईलाजाने वाहतुक सुरळीत होईपर्यत ताटकळत रहावे लागत आहे. पांडाणे टोलनाका भागात वाहनचालकांना येण्यासाठी व जाण्यासाठी एकच रस्ता आहे. या ठिकाणी वाहने अडवून तपासणी प्रक्रिया सुरु झाली की दोन्ही बाजूने वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशी हैराण झाले आहेत. याप्रकरणी एका व्यापायाने विचारणा केली असता त्यास गुजरातच्या हदीतील सापुतारा येथे वाहने तपासणी करणार्‍या पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार सापुतारा पोलीस ठाण्यात करण्यात आली.

धार्मिकस्थळे अन् पर्यटनस्थळे ऑनलाईन बघणे बरे

गुजरातमधून महाराष्ट्रात येताना धरमपूरमार्गे पेठ-नाशिक असा रस्ता आहे. मात्र, या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. या रस्त्याने प्रवास केल्यास वाहने नादुरस्त होतात. हाडे खिळखिळी होतात. त्यामुळे आम्ही सापुतारा, बोरगाव वणीमार्गे प्रवास करतो व परतीच्या प्रवासात याच मार्गाने जातो. मात्र, वाहन तपासणीच्या नावाखाली होणारा त्रास पाहता धार्मिक स्थळे व पर्यटनस्थळे यांचा ऑनलाईन आनंद घेतलेला बरा. अशी प्रतिक्रीया बडोदा येथील जिग्नेश मायाणी यांनी दिली.

- Advertisement -
पोलिसांमुळे भाविक, पर्यटक महाराष्ट्रात येण्यास नाखूश

वाहतूक सुरळीत करणे, अपघात टाळणे ,सुरक्षित वाहतुक ठेवण्यासाठी कर्तव्य बजावणे याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. वाहतुकीस अडथळा होईल, अशी वाहने तपासणीसाठी रस्त्यावर लावण्यास प्रवृत्त करणे , वाहनचालकांना मनस्ताप होईल, अशी वर्तणुक केली जात आहे. त्यामुळे गुजरातचे भाविक व पर्यटक महाराष्ट्रात येण्यास नाखूश असल्याची माहिती सूरत येथील व्यावसायिक भद्रेश पटेल यांनी दिली.

कागदपत्रांची पूर्तता असूनही दिला जातोय त्रास

कुटुंबियासमवेत सुटीचा कालावधी घालविण्यासाठी महाराष्ट्रात येतो. शिर्डीच्या साईबाबांवर नितांत श्रद्धा असल्याने महाराष्ट्रात येत असतो. मात्र, कागदपत्रांची पूर्तता असताना देखील पोलिसांकडून विनाकारण त्रास दिला जात आहे, अशी माहिती नवसारी येथील अमन पटेल यांनी दिली.

पर्यटक कमी होत असल्याने हॉटेल व्यवसायावर परिणाम

अगोदरच महाराष्ट्रातील पर्यटनाला ग्रहण लागले आहे. त्यात मोजके पर्यटक महाराष्ट्रात येत आहेत. त्यांच्यावरच आमचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, पर्यटकांना पोलिसांचा त्रास होत आहे. परिणामी, अनेकांनी महाराष्ट्रात जाण्यास नकार दिला. त्याचा आमच्या धंद्यावर झाला आहे, असे एका हाटेल व्यावसायिकाने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -