घरमहाराष्ट्रनाताळमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ

नाताळमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ

Subscribe

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शनिवारी सुट्टीचा दिवस असला तरी विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर टीका करण्याचे सत्र दिवसभर सुरू राहिले. विशेष म्हणजे ख्रिसमसचा सण असला तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी विविध मुद्यांवरून एकमेकांवर निशाणा साधल्याने नाताळमध्ये राजकारणात राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे सोमवारी अधिवेशनाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री शिंदेंच्या घोटाळ्याची कागदपत्रे दिल्लीमध्ये पोहचली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूरमधील एनआयटी घोटाळ्याची कागदपत्रे दिल्लीत पोहचली असल्याचा दावा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केला.प्रसारमाध्यमांना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील भूखंड घोटाळ्याचे आरोप गंभीर आहेत. त्यामुळे आम्ही केंद्रातील प्रमुख लोकांना कागदपत्रे पाठवली आहेत. योग्य ठिकाणी कागदपत्रे गेली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घाईघाईने दिल्लीत आले आहेत. ते कशाला आले माहीत नाही, पण नक्कीच त्यांची त्याविषयी चर्चा झाली असावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११० कोटींचे भूखंड आपल्या मर्जीतील बिल्डरांना २ कोटी रुपयांना दिले. जे १६ भूखंड गरिबांच्या घरांसाठी राखीव होते. त्यावर काही निष्कर्ष काढण्यात आले होते. तेव्हा भूखंड वाटपाला विरोध झाला होता. तरीही तेव्हाच्या नगरविकास मंत्र्यांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी घाईघाईने भूखंड वाटप केले होते. त्यावर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. आता भलेही न्यायालयाचे समाधान झाले असेल, फक्त २४ तासात तरीही तो भ्रष्टाचार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

आमदार फोडाफोडीची एसआयटी चौकशी करा
दिशा सालियन प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने एसआयटी स्थापन केल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, केंद्र सरकारने नवीन रेशनची पॉलिसी जाहीर केली आहे गरिबांना रेशन देण्यासंदर्भात. त्या पद्धतीने राज्य सरकारने एसआयटीचे रेशन केले आहे. म्हणजे मागेल त्याला एसआयटी. महाराष्ट्रात ४० आमदार ज्या पद्धतीने ५० खोके देऊन फोडण्यात आले, तो काय व्यवहार होता त्यावर एक एसआयटी स्थापन व्हायला हवी, पण जे विषय पोलीस, सीबीआयने संपवले त्यावर एसआयटी स्थापन करून तुम्ही सत्तेचा गैरवापर करीत आहात, पण आम्ही सगळ्या तपासांना सामोरे जायला तयार आहोत. तुम्ही तोंडावर पडाल, असे राऊत यावेळी म्हणाले.

- Advertisement -

अण्णा हजारे गप्प का?
राज्यात एवढा मोठा भूखंड घोटाळा झाला तरीही अण्णा हजारे या विषयावर गप्प का आहेत, असा प्रश्न मी नाही तर समाजमाध्यमांतून विचारला जात आहे. सरकारने बोहणीचा भ्रष्टाचार केला. ११० कोटींचे नुकसान झाले. १६ भूखंड बिल्डरांच्या घशात गेले, तरी त्यावर कोणी काहीच बोलत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारवासारव करतात. ही मोदींच्या विचारधारेची फसवणूक आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

इतके का लागते? –दीपक केसरकर 
राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, आम्ही दिशा सालियनला न्याय द्यायचा, असे म्हटल्याने त्यांना इतके का लागते? आम्ही कोणाचे नाव घेतले आहे का? विधानसभेत एसआयटी नेमण्याची मागणी करण्यात आली. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. खोके घेतल्याबद्दल जे तुरुंगात गेले होते, त्यांनाच त्याचे महत्त्व कळते. खोके काढायचे असतील तर कोणाचे काढले जातील हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे विनाकारण लोक दुखावले जातील असे काही बोलू नका. तुम्हाला लोकांना प्रेम देता आले नाही, त्यांना भेटता आले नाही, त्यांच्या मतदारसंघातील कामे करता आली नाहीत. ती कामे कोट्यवधी रुपयांची आहेत. पैसे घेऊन राजकारण करता आले असते तर सगळेच श्रीमंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले असते. पंतप्रधानही बनू शकले असते, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

राऊतांना मिरची लागली –आशिष शेलार
संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले की, संजय राऊत रोज सकाळी उठून बोलघेवडेपणा करतात, मात्र जनता त्यांच्यासोबत नाही. संजय राऊत आता रामरक्षा म्हणा, रावणरक्षा म्हणणे बंद करा. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही सोडले. तुमचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर झाले आहे, पण स्वाभिमानाने जे आमदार बाहेर पडले त्याची मिरची संजय राऊत यांना लागली आहे. त्यामुळे स्वाभिमान, मर्द, मराठी, हिंदुत्व ही भाषा संजय राऊत आता तुम्हाला ना झेपत, ना तुम्हाला शोभत. ते बंद करा. संजय राऊत यांनी नाशिक दौरा केला आणि त्यानंतर लगेच नाशिकमधील शिवसैनिक ठाकरेंचा पक्ष सोडून गेले. संजय राऊत आता नागपुरात येत आहेत. त्यांच्या नागपूर दौर्‍यानंतरही ठाकरे गटाला अशीच गळती लागेल. त्यामुळे नागपुरात संजय राऊत यांचे स्वागत आहे, असा टोलाही आशिष शेलारांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -