घरमहाराष्ट्रनागपूरNagpur News : काटोलच्या शासकीय कार्यक्रमात गोंधळ, फडणवीसांसमोर अनिल देशमुख संतापले

Nagpur News : काटोलच्या शासकीय कार्यक्रमात गोंधळ, फडणवीसांसमोर अनिल देशमुख संतापले

Subscribe

नागपूर : काटोल येथे आज (ता. 07 फेब्रुवारी) शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सर्वच राजकीय नेत्यांनी काटोलमधील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी हजेरी लावली होती. परंतु, या कार्यक्रमात राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. शेकापचे नेते राहुल देशमुख हे या कार्यक्रमात भाषण करण्यासाठी व्यासपीठावर आल्यानंतर त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरून केलेल्या आरोपांमुळे भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे या कार्यक्रमात मोठा गदारोळ झाला. ज्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी संताप व्यक्त करत या कार्यक्रमातून काढता पाय घेतला. (Political chaos in Katol government program, Anil Deshmukh got angry front Devendra Fadnavis)

हेही वाचा… Gaikwad Vs Bhujbal : संजय गायकवाडांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तंबी दिली का? जयंत पाटलांचा सवाल

- Advertisement -

काटोल नगर परिषदेच्या विकास कामाचे भूमिपूजन आणि पट्टे वाटपाचा सर्वपक्षीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार गटाचे आमदार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काटोलचे माजी नगराध्यक्ष, शेकापचे नेते राहुल देशमुख, भाजपाचे नेते आशिष देशमुख, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकाच मंचावर उपस्थित होते.

यावेळी राहुल देशमुख यांनी आपल्या भाषणातून आशिष देशमुख यांच्यावर आणि भाजपावर टीका केली. त्यानंतर त्यांना बोलू द्यावे म्हणून अनिल देशमुख यांचे काही कार्यकर्ते उभे राहिले आणि काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करून राहुल देशमुख यांचे भाषण थांबवावे लागले. परंतु, राहुल देशमुखांनी केलेल्या आरोपांवर भाजपा कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. ज्यानंतर या कार्यक्रमात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

- Advertisement -

तर भाषण करण्यासाठी आलेल्या आशिष देशमुख यांनी काटोलचा 20 वर्षे विकास करण्यात आला नाही, असा आरोप करत अनिल देशमुख यांच्यावर टीका केली. त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनात घोषणा दिल्या. आशिष देशमुखांनंतर पुन्हा अनिल देशमुख बोलायला आले आणि त्यांनी आशिष देशमुख 2014 पळून का गेले, आमदारकी का सोडली? अशी टीका केली. तर, शासकीय निधी वाटपासाठी भाजपा मेळावा घेत असल्याच्या आरोपही अनिल देशमुखांनी केला. पण पुन्हा भाजपा कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने अनिल देशमुख संतापून कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेले.

काय म्हणाले अनिल देशमुख?

या कार्यक्रमात भाषण करताना अनिल देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. इथे मंचावर सर्व पक्षाचे लोक आहेत. हा राजकीय कर्यक्रम नाही, इथे सर्व पक्षाचे लोक आहे. पट्टे वाटप ही जुनी योजना आहे. काटोल शहरात 14 वस्त्या आहे, विरेंद्र देशमुख यांनी स्वतःच्या मालकीची जागा देऊन वस्त्या निर्माण केल्या आहेत. हा राजकीय कार्यक्रम नाही, आम्ही पथ्य पाळतो… तुम्हीही पथ्य पाळा, असा सल्ला अनिल देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना दिला.

तर प्रसार माध्यमांसमोर अनिल देशमुख म्हणाले की, तुम्हाला राजकीय भाषण करायचे असेल तर व्यासपीठ मोकळे आहे. कोणत्याही व्यासपीठावर जा आणि राजकीय भाषण करा. पण शासकीय कार्यक्रमात राजकीय भाषण करणे योग्य नाही. अनेक भाजपाच्या नेत्यांनी राजकीय भाषणे केली. ज्यांवर मी आक्षेप घेतला. या कार्यक्रमामध्ये काटोलमधील समस्यांवर, येथील प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. पण ते असताना त्याला राजकीय स्वरूप देण्यात आले ज्याबद्दल मी नाराजी व्यक्त केली आहे, असे त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -