घरताज्या घडामोडीखातेवाटपाचं गुऱ्हाळ अजूनही सुरूच; पण नेते म्हणतात २४ तासांत घोषणा!

खातेवाटपाचं गुऱ्हाळ अजूनही सुरूच; पण नेते म्हणतात २४ तासांत घोषणा!

Subscribe

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर महिन्याभरानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धरून एकूण ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, त्यांना अजूनही खातेवाटप करण्यात आलेलं नाही. मंत्रीपद न मिळाल्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये अनेक आमदार नाराज असल्याचं दिसून येत असताना तीन पक्षांमध्ये मंत्रीपदांचं वाटप होण्यावरून देखील मतभेद असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच खातेवाटपाला विलंब होत असल्याची चर्चा असून महाविकासआघाडीचे नेते मात्र सारंकाही आलबेल असल्याचं बोलत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये नक्की चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खातेवाटप हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार – अजित पवार

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज सरकारमधील खातेवाटपासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि महाविकासआघाडीतील इतर नेत्यांमध्ये बैठक झाली. मात्र, या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याविषयी आपल्याला काहीही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मात्र, त्यासोबतच, ‘खातेवाटप सुरू होतं, तेव्हाच ही चर्चा झाली आहे. प्रत्येक वेळी कुणी काय मागायचं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण नवीन वर्षात खातेवाटप व्हावं आणि सगळ्यांना खात्यांचा कारभार दिला जावा. सध्या ३५ बिनखात्याचे मंत्री आहेत. खातं कुणाला कोणतं द्यायचं, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे’, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

संग्राम थोपटेंशी चर्चा झाली – बाळासाहेब थोरात

दरम्यान, या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी मात्र सूचक प्रतिक्रिया दिली. ‘आज रात्रीपर्यंत खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. पण काँग्रेस पक्ष म्हणून आमची इच्छा आहे की अजून २ प्रमुख विभाग आम्हाला मिळायला हवेत. त्यासंदर्भात आमची चर्चा सुरू आहे’, असं थोरात म्हणाले. दरम्यान, पुण्यात संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजीतून काँग्रेसच्याच कार्यालयात तोडफोड केल्याच्या वृत्तावर थोरातांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमच्याच कार्यकर्त्यांनी पुण्यात रोष व्यक्त केला आहे. तसं नको होतं करायला. संग्राम थोपटेंशी बोलणं झालं आहे. त्यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठींचा निर्णय आम्हाला मान्य असल्याचं सांगितलं. आता आम्ही बसून चर्चा करू’, असं ते म्हणाले.

फडणवीसांना आता दुसरं काम नाही – जयंत पाटील

दरम्यान, या सर्व मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील भूमिका मांडली. ‘महाविकासआघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांना यादी जाहीर करण्याचे अधिकार आहेत. आणि काँग्रेसला जर ग्रामीण भागाशी संबंधित महत्त्वाचं खातं अपेक्षित असेल, तर ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील’, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ‘थोड्याच दिवसांचं सरकार’ या टीकेवर देखील जयंत पाटील यांनी कोपरखळी मारली. ‘देवेंद्र फडणवीसांना आता याच्याशिवाय दुसरं काम नाही. ते बिचारे असं करणारच. माझी पूर्ण सहानुभूती आहे त्यांना. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणेच हे सरकार थोडं थोडं करून आपला पूर्ण कार्यकाळ करेल’, असा टोला त्यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -