घरमहाराष्ट्रराज्यात रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता - एसबीटीसी

राज्यात रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता – एसबीटीसी

Subscribe

नवरात्रोत्सवात गरबा, दांडियाऐवजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून करण्यात आले आहे.

कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे रक्त संकलनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये वाढत्या उष्णतेमुळे रक्तदानाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी रक्ताचा तुटवडा अधिक भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवात गरबा, दांडियाऐवजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून करण्यात आले आहे.

मुंबईतील जे.जे., सायन, केईएम, नायर आणि कूपर या रुग्णालयांमधील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता भासू लागली आहे. या रक्तपेढ्यांकडे जवळपास १०० युनिट तर सेंट जॉर्ज, राजावाडी, कामा रुग्णालयांमधील रक्तपेढ्यांमध्ये ५० युनिट रक्तसाठा शिल्लक राहिला आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने अन्य आजाराच्या व्यक्ती रुग्णालयात जाऊ लागल्या आहेत. ऑक्टोबर हिटमुळे नागरिक घरातून बाहेर पडण्याचे प्रमाण कमी असते. त्यातच यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत. परिणामी रक्तदानात अधिकच घट झाली आहे. रक्ताची वाढती मागणी लक्षात घेऊन नवरात्रोत्सव काळात नवरात्रोत्सव मंडळांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील रक्तपेढ्यांनी आपल्या क्षेत्रातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून १७ ते २५ ऑक्टोबरपर्यंत स्वैच्छिक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे रक्तदान सामाजिक अंतर व इतर नियमांचे पालन करून करण्यात यावे अशा सूचनाही परिषदेकडून देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

१७ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सव कार्यक्रमात यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने गरबा, दांडिय व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी आरोग्य विषयक शिबिरांवर भर देण्यात यावे. कोरोना, मलेरिया, डेंग्यू हे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन गृह विभागाकडून सर्व नवरात्रोत्सव मंडळांना करण्यात आले आहे.

एप्रिल, जून, ऑक्टोबर, नोव्हेबरमध्ये साधारणत रक्ताचा तुटवडा असतो. त्यात यंदा कोरोनाची भर पडली. त्यामुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाणही कमी झाले आहे. नागरिकही घरातून बाहेर पडत नसल्याने रक्तदानाच्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात रक्तपेढ्या व मंडळांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. त्याला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. जेणेकरून रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी रक्त उपलब्ध होईल.
– डॉ. अरुण थोरात, संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -