घरमहाराष्ट्रउंदीर-घुशींनी फोडला खडकवासला धरणाचा कालवा?

उंदीर-घुशींनी फोडला खडकवासला धरणाचा कालवा?

Subscribe

कालव्याच्या कडेने प्रचंड अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे उंदीर, घुशी मोठ्या प्रमाणात झाले आहेत. तसेच पाण्यातून वहात आलेले खेकडेही आहेत. कालव्यात मातीचा बेस असतो. त्यामुळे घुशी, उंदीर, खेकडे हे जमीन पोखरत जातात. हा प्रकार १२ महिने २४ तास सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यामुळेच हा प्रकार घडल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून ठामपणे करण्यात आला आहे.

पुण्यामध्ये गुरुवारी मुठा कालवा फुटून निर्माण झालेल्या पूर सदृश परिस्थितीसाठी उंदीर, घुशी कारणीभूत असल्याचा अजब दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात आला आहे. मुठा नदीचा उजवा कालवा फुटल्यामुळे दांडेकर पूल आणि आसपासच्या परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. पर्वती पायथा आणि आसपासच्या परिसरातले शेकडो संसार या पाण्यामुळे उघड्यावर आले आहेत. हे सगळं पाणी ओसरल्यानंतर एकीकडे उघड्यावर आलेले संसार सावरत असतानाच ही दुर्घटना का झाली? याची कारणमीमांसा सुरू झाली आहे.

कसा फुटला कालवा?

गुरुवारी सकाळी ११च्या सुमारास पुणे शहराला पाणीपुरवठा करणारा खडकवासला धरणाचा उजवा कालवा फुटल्यामुळे मोठा गहजब उडाला. गेल्या महिन्याभरापासून खडकवासला धरणापासून या कालव्यातून पाण्याचा विसर्ग केला जात होता. गुरुवारी सकाळी अचानक या कालव्याची भिंत फुटल्यामुळे पाणी थेट शहरात घुसलं. यामुळे पर्वती पायथा, दांडेकर पूल ते थेट अलका टॉकीजपर्यंत पाणी पसरल्यामुळे पुण्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पर्वती पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टी परिसराला या पाण्याचा सर्वात मोठा फटका बसला. या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्यामुळे अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले.

- Advertisement -

जलसंपदा विभागाचा अजब दावा

शहरात पसरलेले कालव्याचे पाणी ओसरल्यानंतर आता हे का घडलं? याची कारणमीमांसा सुरू झाली आहे. गुरूवारी घडलेल्या या घटनेनंतर शुक्रवारी जलसंपदा विभागाकडून कॅनॉलच्या कामाची पाहणी करण्यात आली. शिवाय जलसंपदा अधिकाऱ्यांनी बाधितांची भेटही घेतली. या प्रकारामध्ये नक्की कुणाची चूक होती याचा ठोकताळा बांधताना आता संशयाची सुई उंदीर, घुशी आणि खेकड्यांकडे वळवण्यात आली आहे. कालव्याच्या कडेने प्रचंड अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे उंदीर, घुशी मोठ्या प्रमाणात झाले आहेत. तसेच पाण्यातून वहात आलेले खेकडेही आहेत. कालव्यात मातीचा बेस असतो. त्यामुळे घुशी, उंदीर, खेकडे हे जमीन पोखरत जातात. हा प्रकार १२ महिने २४ तास सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यामुळेच हा प्रकार घडल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून ठामपणे करण्यात आला आहे.

पाटबंधारे खात्याच्या मुख्य अभियंत्यांची समिती

दरम्यान, झालेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी पाटबंधारे खात्याच्या मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. यातून केबलमुळे हा प्रकार झाला की उंदीर, घुशी, खेकडे यांच्यामुळे झाला, याची चौकशी ही समिती करेल. तसेच या समितीने येत्या दोन-तीन दिवसांत चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तसेच कालव्याला भगदाड पडल्याचे आधी समजले होते का? कोणी कळवळे होते? कोण वेळेत पोहोचले नाही? कोणी दुर्लक्ष केले? हेही या चौकशी अहवालातून स्पष्ट होईल.

- Advertisement -

घटनाग्रस्तांसाठी ३०० कोटींची मागणी

या घटनेची तीव्रता लक्षात घेता घटनाग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी राज्य सरकारकडून ३०० कोटींच्या मदतीची मागणी केली आहे. या घटनेमध्ये एकूण १०० घरांचे पूर्ण नुकसान झाले असून २०० ते २२५ घरांमध्ये पाणी गेल्यामुळे त्यांच्या घरातील वस्तूंचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात मदतीची मागणी करणारे पत्र पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले आहे.


तुम्ही हे पाहिलंत का? – पुण्यातल्या हाहाकाराची ड्रोनने टिपलेली ही दृश्यं!


‘उंदीर, घुशी कोण? वीज विभाग की खासगी कंपन्या’?

दरम्यान, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील कालवा फुटीप्रकरणी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. ‘पुण्याला पालकमंत्री असले तरी पुणे हे अनाथ आहे. सुरक्षिततेचा विचार करून जलवाहिनी आणि कालव्याचे काम करायला हवे होते. पुणे महापालिकेतील आजी आणि माजी सत्ताधाऱ्यांनी ते केल्याचे दिसत नाही.
कालव्याच्या भींतीजवळ बेकायदेशीरपणे वीज विभाग आणि खासगी कंपन्यांच्या वायर्स टाकल्या आहेत. आता अधिकाऱ्यांनी यातील उंदीर आणि घुशी कोण आहेत? याच शोध लावावा’, अशी टीका गोऱ्हे यांनी केली. ‘पाटबंधारे विभाग आणि महानगरपालिका या दोन्ही यंत्रणांमध्ये ताळमेळ नसल्याने हा प्रकार घडला आहे. काही वृत्तपत्र तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी वारंवार या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या तरीदेखील यंत्रणांनी काम केले नाही. परंतु लोकांच्या जीवावर बेतेपर्यंत प्रशासन शांत बसणार का?’ असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -