राहुल नार्वेकर 20वे विधानसभा अध्यक्ष

Vidhan Bhawan

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक एकनाथ शिंदे सरकारने सहजरीत्या जिंकली. गेले काही दिवस एकनाथ शिंदे यांची शिवसेनेतील बंडखोरी, महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येऊन कोसळणे आणि भाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे सरकारची स्थापना या सर्व नाट्यमय घडामोडी घडत होत्या. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व आले होते. या विजयामुळे राहुल नार्वेकर हे 1937पासूनचे 20वे तर, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरचे (1960) 16वे विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत.

हेही वाचा – आरेतील कारशेडला सुमीत राघवनचा पाठिंबा; पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप

या निवडणुकीत भाजपाचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी आमने-सामने होते. सत्ताधारी आमदारांची 164 मते राहुल नार्वेकर यांना मिळाली. तर, त्यांच्या विरोधात 107 मते राजन साळवी यांना मिळाली. सपा आणि एमआयएमच्या एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. तर, राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख व नवाब मलिक यांच्यासह 12 आमदार अनुपस्थित होते.

गणेश मावळणकर हे 1937 साली मुंबई राज्य विधानसभेचे पहिले अध्यक्ष झाले. तर, 1960 साली सयाजी सिलम हे महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते. अलीकडेच पायउतार झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभा अध्यक्ष होते.

हेही वाचा – हम बचेंगे भी और लडेंगे भी…, संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मुंबई राज्य विधानसभा (१९३७ ते १९६०)

१) गणेश वासुदेव मावळणकर (२१ जुलै १९३७ ते २० जानेवारी १९४६)
२) कुंदनमल सोभाचंद फिरोदिया (२१ मे १९४६ ते ३१ जानेवारी १९५२)
३) दत्तात्रय काशिनाथ कुंटे (५ मे १९५२ ते ३१ ऑक्टोबर १९५६)

द्विभाषिक मुंबई राज्य विधानसभा (१९५६ ते १९६०)
४) सयाजी लक्ष्मण सिलम (२१ नोव्हेंबर १९५६ ते ३० एप्रिल १९६०)

महाराष्ट्र विधानसभा (१९६० पासून)
५) सयाजी लक्ष्मण सिलम (१ मे १९६० ते १२ मार्च १९६२)
६) त्र्यबंक शिवराम भारदे (१७ मार्च १९६२ ते १३ मार्च १९६७
१५ मार्च १९६७ ते १५ मार्च १९७२)
७) शेषराव कृष्णराव वानखेडे (२२ मार्च १९७२ ते १३ मार्च १९७७
८) दौलतराव श्रीपतराव ऊर्फ बाळासाहेब देसाई (४ जुलै १९७७ ते १३ मार्च १९७८)
९) शिवराज विश्वनाथ पाटील (१७ मार्च १९७८ ते ६ डिसेंबर १९७९)
१०) प्राणलाल हरिकिशनदास व्होरा (१ फेब्रुवारी १९८० ते २९ जून १९८०)
११) शरद शंकर दिघे (२ जुलै १९८० ते ११ जानेवारी १९८५)
१२) शंकरराव चिमाजी जगताप (२० मार्च १९८५ ते १९ मार्च १९९०)
१३) मधुकरराव धनाजी चौधरी (२१ मार्च १९९० ते २२ मार्च १९९५)
१४) दत्ताजी शंकर नलावडे (२४ मार्च १९९५ ते १९ ऑक्टोबर १९९९)
१५) अरुणलाल गोवर्धनदास गुजराथी (२२ ऑक्टोबर १९९९ ते १७ ऑक्टोबर २००४)
१६) कृष्णराव रखमाजीराव देसाई उर्फ बाबासाहेब कुपेकर (६ नोव्हेंबर २००४ ते ३ नोव्हेंबर २००९)
१७) दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील (११ नोव्हेंबर २००९ ते ८ नोव्हेंबर २०१४)
१८) हरिभाऊ किसनराव बागडे (१२ नोव्हेंबर २०१४ ते २५ नोव्हेंबर २०१९)
१९) नाना फाल्गुनराव पटोले (१ डिसेंबर २०१९ ते ४ फेब्रुवारी २०२१)