घरमहाराष्ट्रMahad road News : खर्डी ते रायगड रोप-वे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायकच

Mahad road News : खर्डी ते रायगड रोप-वे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायकच

Subscribe

खर्डी ते रायगड रोप-वे या रस्त्यावरील खडी दोन महिन्यांतच निघाली आहे. शिवाय उंच चढ आणि अवघड वळणांमुळे या रस्त्यावर अपघाताची भीती आहे. त्यामुळे स्थानिकदेखील या रस्त्यावरून वाहन चालवत नाहीत.

महाड : किल्ले रायगडाकडे जाण्यासाठी खर्डी गावातून उंच डोंगर पार करत नगरभुवन – नेवाळी ते रायगड रोप-वे असा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र अरुंद रस्ता, उंच चढ आणि चढावरच देण्यात आलेल्या अवघड वळणांमुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. स्थानिक वाहनचालक देखील या रस्त्याने जात नाहीत. त्यामुळे रस्ता तयार करणाऱ्या अभियंत्यांचे कौतुक केले पाहिजे, अशी खोचक टीका स्थानिक करत आहेत.

महाड कुंजर बाजार ते किल्ले रायगड असा २४ किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्याचे रुंदीकरण दोन वर्षांपासून सुरू आहे. त्याचप्रमाणे माणगाव निजामपूर ते किल्ले रायगड असा एक रस्ता सुरू झाला आहे. गडावरील वाढती गर्दी पाहता पर्यायी रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये महाड – रायगड मार्गावरील खर्डी गावातून नगरभुवन – खडकी – मेवाडी ते रायगड रोप-वे असा एक रस्ता तयार करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Mahad News : भूमिपूजनाचा गाजावाजा तरीही रस्त्यांसह अनेक प्रकल्प अर्धवटच

रस्त्यासाठी कोट्यवधींचा खर्च?

यापूर्वी खर्डी – नगरभुवन असा रस्ता आधीच तयार करण्यात आला होता. तो पुढे जोडत रायगड रोप-वेपर्यंत नेण्यात आला आहे. मात्र हा रस्ता तयार करताना या कामांमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप होत आहे. प्रत्येक टप्प्यामध्ये कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे दाखवण्यात आले आहेत. मुळातच हा रस्ता अरुंद आहे. खडकी गावापासून तीव्र चढ, चढावरच असलेली अवघड वळणे, खचलेली साईडपट्टी, यामुळे हा मार्ग सध्यातरी अत्यंत धोकादायक आहे. छोटी वाहने चढावर चढत नसून अरुंद वळणावर ही वाहने घसरण्याची जास्त भीती आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Water Crisis : पूर आणि पाणीटंचाईचा महाडचा शाप कधी पुसणार?

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक, शिवजयंती, शिवपुण्यतिथी अशा विविध कार्यक्रमांना लाखो शिवभक्त येत असतात. अशावेळी मुख्य मार्ग असलेला महाड – रायगड मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते. यामुळे रायगडपासून विविध पर्यायी मार्ग सुरू करण्याचे काम हातात घेण्यात आले आहे. यापैकी रायगड रोप-वेपासून खर्डी गावापर्यंत करण्यात आलेला रस्ता धोकादायक आहे.

रस्ता किती धोकेदायक?

या मार्गावरून नवखा चालक अवघड वळणे उतरताना किंवा चढताना दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे पर्यटकांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक आहे. या मार्गावरून एसटी देखील जाणे शक्य नाही. स्थानिक देखील येथून वाहने नेत नाहीत. मालवाहतूक करणारी कोणतीच गाडी खडकीपासून असलेल्या चढावर चढू शकत नाही, असे स्थानिक सांगतात. या संपूर्ण मार्गावर साईडपट्टीचा पत्ताच नाही.

या रस्त्यात ज्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी पाईप टाकले आहेत त्याठिकाणी संरक्षणकडे देखील बांधण्यात आलेले नाहीत. शिवाय दोन महिन्यांपूर्वी केलेला रस्ता किरकोळ वाहनांनी उखडून जावू लागला आहे. यामुळे या निकृष्ट कामाची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून हे रस्ते होत असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे.

पीडब्लूडीने अजून विचार करावा!

खर्डी ते रायगड रोप-वे या रस्त्यावर अत्यंत धोकादायक वळणे आहेत. तसेच पर्यायी जागा असताना देखील स्थानिकांचा विचार न घेताच वळणे देण्यात आली आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने अजून विचार करण्याची गरज आहे

– दिलीप आखाडे, ग्रामस्थ. नेवाळी वाडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -