घरमहाराष्ट्रRaigad Water Crisis : गाळमुक्त शार्लोट तलाव केवळ स्वप्नच!

Raigad Water Crisis : गाळमुक्त शार्लोट तलाव केवळ स्वप्नच!

Subscribe
दिनेश सुतार : आपलं महानगर वृत्तसेवा

माथेरान : रायगड जिल्ह्यातील हिल स्टेशन म्हणजे माथेरान. आता उन्हाळ्यामुळे पर्यटकांची रिघ लागलेली असते. किंबहुना पर्यटन हेच माथेरान नगरपरिषदेचा आणि स्थानिकाच्या उत्पन्नाचे एकमेव माध्यम आहे. असे असतानाही पाणीपुरवठा हा कायम दुर्लक्षित राहिलेला मुद्दा आहे. माथेरानची वस्ती ६ ते ७ हजारांची आणि त्यांना शार्लोट तलावातून पाणीपुरवठा केला जातो. दुर्दैव म्हणजे हाच शार्लोट तलाव गाळात रुतलेला आहे.

निसर्गसुंदर पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानची तहान शार्लोट तलाव भागवतो. हा तलाव पाण्यापेक्षा गाळाने जास्त भरलेला असतो. त्यामुळे उन्हाळा सुरू झाला की, पाणीटंचाईला सुरुवात होते. म्हणूनच यंदातरी शार्लोट तलाव गाळमुक्तीचा मोकळा श्वास घेणार का, असा प्रश्न माथेरानकर विचारत आहेत. शार्लोटमधील गाळामुळे नेरळ कुंभे येथून माथेरानला पाणीपुरवठा करावा लागत आहे. ज्याच्या खर्चाचा मोठा फार माथेरानकरांच्या खिशावर पडतो. सध्या विभागानुसार आठवड्यानुसार एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. शिवाय दिवसातून एक तास पाणीपुरवठा होतो. तोही पूर्ण दाबाने होत नाही, अशी माथेरानकरांची तक्रार आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Water Crisis : कर्जतमध्ये जलजीवन योजनेचा बोऱ्या, पाणीटंचाईच्या तीव्र झळा

ब्रिटिशकालीन शार्लोट तलावातून माथेरानची तहान भागते. महाराष्ट्र जीवन प्राधिकारणामार्फत या तलावाची देखभाल, दुरुस्ती केली जाते. पण नऊ वर्षे झाली या तलावाची सफाई न केल्यामुळे गाळाचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात जमिनीची धूप होऊन तीन दिशांचे पाणी या तलावात येते. परिणामी तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजीपी) नऊ वर्षे या तलावाकडे विशेष लक्ष दिले नाही. २०१५ मध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने श्रीसदस्यांनी या तलावाची विनामूल्य सफाई करून प्रचंड गाळ काढला होता. तेव्हापासून माथेरानला स्वच्छ पाणी मिळत आहे. पण आता नेरळ कुंभे येथून पाणीपुरवठा सुरळीत असल्याने शार्लोट तलावाकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप होत आहे.

- Advertisement -

शार्लोट तलाव ५०० मीटर लांब, ८० मीटर रुंद आणि ५० फूट खोल आहे. ऑक्टोबरमध्ये तलाव तुडुंब भरलेला असतो. आता येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता या तलावातील पाणी फक्त चार महिने पुरते. यासाठी एमजीपीचे अधिकारी या तलावातील पाणी उपसा कमी प्रमाणात करतात. यावर्षी मार्चमध्ये ४० फुटापर्यंत पाणी साठा होता. या ४० फुटातील पाण्यामध्ये २५ फूट गाळ असल्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

हेही वाचा… Raigad Water Crisis : दे माय… पाणी दे, पाणी दे!

एमजीपी गाळ काढण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने माथेरान नगरपालिकेने या गंभीर बाबीकडे लक्ष दिले होते. याबाबत जुलै २०२१ मध्ये तलावाच्या सफाईसाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून ६ लाख ६६ हजार रुपयांची तांत्रिक मान्यता घेतली होती. मात्र अर्ध्यापेक्षा जास्त पाऊस उलटून गेल्यानंतरही या तलावाच्या सफाईला एमजीपीने मान्यता दिली नाही. त्यामुळे गाळ काढता आला नाही, असा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रसाद सावंत यांनी केला आहे. शिवाय पाणीपातळी वाढवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून तलावात श्रमदान केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान एमजीपी दुर्लक्ष करत असेल तर नगरपरिषदेने तलावातील गाळा काढावा, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

ब्रिटिशांची दूरदृष्टी

१८५६ मध्ये फुलर या इंग्रज अधिकाऱ्याने शार्लोट तलाव बांधला. तीन दिशांकडून येणारे पाणी एकत्र करत त्यांने बांध टाकून छोटा तलाव बांधला. या तलावाला पत्नीचे शार्लोट हेच नाव दिले. पुढे स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष गोपाळराव शिंदे यांनी हा तलाव मोठा करून पाण्याची पातळी वाढवली. तेव्हापासून शार्लोट तलाव जसा आहे तसाच आहे. तलाव आणखी मोठा करण्याची, नियमित गाळ काढण्याची दूरदृष्टी आपल्या प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे दिसली नाही.

हेही वाचा… Raigad Water Crisis : तहानलेल्या पेण तालुक्याला ५ दिवसांआड पाणी

गाळ काढण्याकडे दुर्लक्ष

यापूर्वी एमजेपीच्या माध्यमातून गावातील लोकांना रोजगार देऊन ८ ते १० दिवस शार्लोट तलावातील गाळ काढला जायचा. त्यामुळे पाण्याची पातळी वाढून माथेरानकरांना स्वच्छ पाणी मिळत होते. पण १० वर्षांपासून निधीअभावी एमजेपीकडून तलावातील गाळ काढला जात नाही. म्हणूनच आता नगरपरिषद आणि एमजेपी यांनी एकत्रित गाळ काढण्याचे काम करावे, अशी माथेरानकरांची अपेक्षा आहे.

गेल्या वर्षीची पुनरावृत्ती नको

शार्लोट तलाव गाळमुक्त करण्यासाठी गेल्या वर्षी नगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एकत्र आले होते. नगरपरिषदेने पैशांची व्यवस्था केली होती. पण तलावातील पाणी ज्या मार्गाने सोडण्यात येणार होते त्या गावांना याची माहिती न दिल्यामुळे हे काम थांबवण्यात आले. त्याची पुनरावृत्ती पुन्हा नये यासाठी या कामाचे नियोजन एप्रिलपासूनच करावे अशी स्थानिकांची मागणी आहे.

आताच नियोजन करा

यंदा माथेरानमध्ये पाण्यासाठी वारांचे नियोजन केले आहे. शार्लोट तलाव गाळमुक्त झाला असता तर माथेरानमधील पाणीटंचाईची समस्या बऱ्याच अंशी दूर झाली असती. म्हणूनच एमजेपीने पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आतापासूनच केले पाहिजे. – नितीन विश्वनाथ सावंत, स्थानिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -