घरसंपादकीयओपेडनेत्यांची सोय आणि शिवसैनिकांची गैरसोय!

नेत्यांची सोय आणि शिवसैनिकांची गैरसोय!

Subscribe

मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेतून नेते मंडळी आपल्या सोयीनुसार बाहेर पडले किंवा जे पक्षात राहिले त्यांनी आपली सोय पाहिली, पण त्यांनी निर्णय घेताना शिवसेनेची जीवावर उदार होऊन लढणारी जी ताकद आहे, त्या शिवसैनिकाला काय वाटेल, याचा विचार केेलेला दिसत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना बाजूला करून उद्धव ठाकरे यांना पक्षाचे प्रमुख केले. त्यानंतर राज ठाकरे बाहेर पडले. नारायण राणे बाहेर पडले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली. त्यानंतर अगदी अलीकडे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर न पडता पक्षावर आपला दावा केला. उद्धव ठाकरे यांना बाजूला केले. या सर्व नेत्यांनी निर्णय घेताना शिवसैनिकांना काय वाटेल याचा विचार केला असता तर पक्षाची सध्याची छिन्नविच्छिन्न अवस्था झाली नसती.

मुंबईतील हतबल झालेल्या मराठी माणसाच्या मनात नवी ऊर्जा भरून त्याला आपल्या न्याय हक्कांसाठी लढण्यास सिद्ध करण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील सर्वसामान्य मराठी माणसांमधून शिवसेना उभी केली. त्यानंतर शिवसेनेचा विस्तार राज्यभर झाला, पण तो इतका नव्हता की, शिवसेना स्वबळावर राज्यात सत्तेवर येईल, त्यामुळे मग शिवसेनेने समविचारी असलेल्या भारतीय जनता पार्टीशी युती केली. त्या माध्यमातून १९९५ साली दोन्ही पक्षांची युती राज्यात सत्तेवर आली.

दोघांनाही एकमेकांची गरज होती, त्यामुळेच त्यांनी हातमिळवणी केलेली होती. कारण आपल्या मर्यादा पडतात, याची शिवसेनेला कल्पना आलेली होती आणि आपण महाराष्ट्रात तसे नवीन आहोत, त्यामुळे आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून आपला विस्तार करता येईल, असे भाजपला वाटत होते. या दोन्ही पक्षांच्या युतीचे सरकार जसे राज्यात आले, तसेच त्यांच्या युतीची सरकारे राज्याच्या विविध महानगरपालिकांमध्ये होती. पण जसा काळ पुढे सरकत गेला, तशी शिवसेनेमध्ये स्थित्यंतरे होत गेली. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्याच्यावर केंद्रीय नेतृत्वाची पकड होती. त्यामुळे त्या पक्षामध्ये फूट पडली नाही.

- Advertisement -

त्यांच्या काही नेत्यांनी पक्षांतरे केली, असली तरी ते छोटे नेते होते, त्यामुळे पक्षावर त्याचा काही परिणाम झाला नाही. शिवसेनेच्या बाबतीत परिस्थिती वेगळी होती. शिवसेनेला मोठा फटका राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून दुसरा पक्ष स्थापन केल्यावर बसला. कारण त्या अगोदर छगन भुजबळ यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने शिवसेना सोडलेली होती, पण राज ठाकरे यांनी शिवसेना सोडणे याला वेगळेपण होते. कारण राज ठाकरे यांना शिवसैनिक प्रतिबाळासाहेब ठाकरे मानत असत. बाळासाहेबांसारखे दिसणे, बोलणे, हावभाव करणे या सगळ्या गोष्टी राज ठाकरे यांच्याकडे आहेत.

शिवसेेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरे असेच शिवसैनिकांना वाटत होते, पण पुढे बाळासाहेबांनी शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती दिली. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपली पक्षात घुसमट होत आहे, असे सांगत शिवसेना सोडली. राज ठाकरे यांनी आपली घुसमट होत आहे, असे सांगून पक्ष सोडला, पण सामान्य शिवसैनिकांची अवस्था मात्र कोणता झेंडा घेऊ होती, अशी झाली. कारण ठाकरे घराण्यात फूट पडू नये, अशीच त्यांची भावना होती. या भावनेचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विचार करायला हवा होता.

- Advertisement -

कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर आपल्या शब्दाखातर जीवाची बाजी लावणार्‍या शिवसैनिकांचे काय होईल, हा विचार पक्षातील नेत्यांनी करणे आवश्यक होते. पण प्रत्येक नेत्याने मराठी माणूस आणि त्यासाठी स्थापन झालेल्या संघटनेपेक्षा आपली कशी सरशी होईल, याचा विचार केला. त्यामुळेच पुढे शिवसेनेची शकले पडत गेली. त्याचा प्रवास अलीकडे एकनाथ शिंदे यांनी पक्षामध्ये केलेले बंड आणि सगळ्या पक्षावर केलेला दावा इथपर्यंत झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपचा पाठिंबा होता, हे नंतर स्पष्ट झाले.

आजवर झालेल्या बंडापेक्षा शिंदे यांनी केलेेले बंड वेगळे होते, कारण या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना पक्ष आणि चिन्ह दोन्हीही गमवावे लागले. याची कदाचित त्यांनी कल्पनाही केलेली नसेल. एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेवर आपला दावा केला, त्याला निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली. शिंदे यांच्या मागे शिवसेनेतील बरेच खासदार, आमदार आणि पदाधिकारीही आले. शिंदे भाजपसोबत आले तेव्हा त्यांना काही तरी वचन दिले असेल, त्याशिवाय त्यांनी एवढे मोठे धाडस केले नसते. यापूर्वी शिवसेनेतून बंड करून काँग्रेसमध्ये आलेल्या नारायण राणे यांनाही काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले होेते, पण पुढे ते पाळण्यात आले नाही.

त्यानंतर त्याविषयीची नाराजी नारायण राणे यांनी व्यक्त केली होती. पुढे राणे काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये आले. शिंदे यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी शिवसेनेतून बंड केले, असे मानले तर त्याची सुरुवात उद्धव ठाकरे यांनीच केली होती. कारण भाजप आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी द्यायला तयार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी अकल्पनीय असा निर्णय घेतला. याचा भाजपलासुद्धा आसभास नव्हता. शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या महाविकास आघाडीत ते सहभागी झाले. त्यामुळे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे खेचून आणण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, पण त्याचे दूरगामी वाईट परिणाम झाले.

कारण ज्या पक्षांच्या आघाडीत ते सहभागी झाले, त्यांच्या आणि ठाकरे यांच्या विचारसरणीत मूलभूत फरक होता आणि आहे. जेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवून भाजपची जिरवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा शिवसैनिकांचे काय होईल, याचा त्यांनी विचार केला का? कारण वरच्या पातळीवर नेते मंडळी त्यांच्या सोयीप्रमाणे निर्णय घेतात, पण लोकांमध्ये नेहमी वावरणार्‍या कार्यकर्त्यांची कोंडी होते. कारण त्यांना लोकांना सामोरे जायचे असते. अरे काय तुमचा साहेब, सत्तेसाठी सगळे विसरला, अशी लोकांची बोलणी कार्यकर्त्यांना ऐकून घ्यावी लागतात, मान खाली घालावी लागते.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपल्या विचासरणीच्या विरोधात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसैनिकांना हात मिळवावे लागत होते. तेच त्यांना अवघड जाऊ लागले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करताना आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत, असे सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी जी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली होती, ती आम्ही मुक्त केली, असे एकनाथ शिंदे सांगत आहेत, पण हे करत असताना त्यांनी मूळ शिवसेनाच उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरावून घेतली. कारण शिवसेना हे नाव ठाकरे या आडनावाशी संबंधित आहे. त्यामुळे आपल्या या निर्णयाचा शिवसैनिकांवर काय परिणाम होईल, याचा एकनाथ शिंदे यांनी विचार केला असेल का?

शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करणारे राज ठाकरे यांचा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर नुकताच पाडवा मेळावा झाला, त्यावेळी राज्यभरातून प्रचंड मोठ्या संख्येने मनसैनिक आलेले होते. ते सगळे काही वर्षांपूर्वीचे शिवसैनिकच आहेत. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या मनसैनिकांना असे वाटत होते की, साहेब काही तरी निर्णय घेतील आणि पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील, पण तसे काही झाले नाही. राज यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे मोठ्या संख्येने आलेले मनसैनिक नाराज झाले.

आज एकमेकांच्या विरोधात लढणारे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नारायण राणे, एकनाथ शिंदे जर मूळ शिवसेनेत असते तर पक्षाची ताकद किती वाढली असती याचा या नेत्यांनीच विचार करायला हवा. आपले सगळे नेते एकत्र असले असते तर आपल्या पक्षाचे तुकडे पडले नसते. आपली मोठी ताकद असली असती, असे शिवसैनिकांना वाटते. खरे तर आपण मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी एकसंध राहण्याची शपथ घेतली होती, तेच आपण नेत्यांच्या निर्णयामुळे एकमेकांच्या विरोधात लढत आहोत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी आपल्या जाहीर भाषणात म्हणायचे, माझी खरी ताकद हे माझे समोर बसलेले शिवसैनिक आहेत. शिवसैनिक हा आजही एकसंध आहेत, पण त्यांच्या नेत्यांच्या निर्णयामुळे विभागला गेला आहे. भाजप आणि शिवसेनेची युती होती. या युतीतल्या भाजपची ताकद राज्यात वाढत गेली, त्यांचे नेते पक्षातून बाहेर पडले नाहीत. त्याच वेळी शिवसेनेतून अनेक प्रमुख नेते बाहेर पडले. त्यामुळे शिवसेना कमकुवत झाली.

आता भाजपसोबत आलेल्या एकनाथ शिंदे यांना भाजप सांगेल तितक्या जागांवर समाधान मानण्याशिवाय पर्याय नाही. भाजपने शिवसेना फोडली, असे मानले तरी एकेकाळी मराठी माणसाच्या हितासाठी एकसंध राहू, असे ठामपणे सांगणारे शिवसेनेतील नेते आपापल्या हिताचा विचार करून बाहेर पडले. त्यांनी आपल्या निर्णयामुळे शिवसैनिकांना काय वाटेल, याचा विचार केला असता तर शिवसेनेची ही अवस्था झाली नसती.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -