घरठाणेआसनगाव स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको

आसनगाव स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको

Subscribe

शहापूर : लोकल लेट झाल्याने संतप्त प्रवाशांनी आज सकाळी आसनगाव रेल्वे स्थानकात रेल रोको केला. कसाऱ्याहून मुंबईला जाणारी ७.५९ ची लोकल लेट झाल्याने ८.३० ची आसनगाव-सीएसएमटी लोकल प्रवाशांनी रोखली. यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. ओव्हरहेड वायर तुटणे, सिग्नल फेल, मालगाडीचे इंजिन फेल, मालगाडी, मेल, एक्सप्रेस या गाड्या लोकलच्या पुढे काढणे या घटना वारंवार घडत असल्याने चाकरमानी प्रवाशांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

या घटनांमुळे प्रवाशी अगदी मेटाकुटीस आला असून रेल्वे प्रशासन मात्र याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने आज ऐन गर्दीच्यावेळी सकाळी साडे आठला आसनगाव स्थानकात प्रवाशांनी रेल रोको करून रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

- Advertisement -

कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणारी ७.५९ ची लोकल आसनगाव स्थानकात आज ८.४७ ला आली. या दरम्यान ८.३० वाजता आसनगाव स्थानकातून सीएसएमटीला जाणारी लोकल संतप्त प्रवाशांनी ट्रकवर उतरून अडवली. वारंवार लोकल लेट करून प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे प्रशासनाला जाब विचारला.

प्रवाशांनी अचानक केलेल्या या रेलरोकोमुळे रेल्वे प्रशासनाची मात्र धावपळ उडाली. त्यानंतर आसनगाव लोकल मुंबईला रवाना करण्याची घोषणा केल्यानंतर प्रवाशांनी रेलरोको मागे घेतला. दरम्यान, टिटवाळा ते कसारा दरम्यान मालगाडीचे इंजिन फेल होण्याच्या घटना नित्याचाच झाल्या असून ओव्हरहेड वायर तुटणे, सिग्नल यंत्रणेत बिघाड, मालगाडी, मेल, एक्सप्रेस या गाड्या लोकलच्या पुढे काढणे या कारणांमुळे चाकरमानी प्रवाशी त्रस्त झाला असून आज सकाळी लोकल लेट झाल्याने आसनगाव स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको करून संतापाला वाट मोकळी करून दिली.

- Advertisement -

दरम्यान, शुक्रवारी रात्री वासिंद -आसनगाव दरम्यान साडे दहाच्या सुमारास मालगाडीचे इंजिन फेल झाल्याने डाऊन मार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली. वासिंद येथून अन्य इंजिन उपलब्ध केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. यामुळे मालागडीच्या पाठीमागे असलेल्या दोन कसारा लोकल तसेच लांबपल्ल्याच्या हावडा एक्सप्रेस, शिर्डी एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, वाराणसी एक्सप्रेस या गाड्या तब्बल दोन तास उशिराने धावत होत्या. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा संतप्त प्रवाशांकडून आणि रेल्वे संघटनांकडून दिला जात आहे.


हेही वाचा : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -