घरमहाराष्ट्रउद्या 'राज' गर्जना; उद्धव ठाकरे-संजय राऊत, निशाण्यावर कोण?

उद्या ‘राज’ गर्जना; उद्धव ठाकरे-संजय राऊत, निशाण्यावर कोण?

Subscribe

मुंबईः मी २२ तारखेला जे काही आहे ते बोलणार आहे, असे संकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या मेळाव्यात दिले होते. त्यामुळे उद्या, बुधवारी होणाऱ्या गुढीपाढव्याच्या सभेत राज ठाकरे नेमकी कोणावर तोफ डागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर नेमका कसा निशाणा साधणार याची चर्चा सुरु आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या धर्तीवर राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळावा सुरु केला आहे. शिवसेनेप्रमाणे या मेळ्याव्याचीही जय्यत तयारी केली जाते. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून या मेळाव्यासाठी मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी येतात. राज ठाकरे नेमकी कोणावर टीका करणार याकडे सर्वांचेच लागलेले असते. महाराष्ट्रात सत्ता बदल झाला आहे. शिवसेनेत फूट पडली आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारने महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत लागू केली आहे. मुंबईचा कायापालट करण्यासाठी विविध योजना जाहिर करण्यात आल्या आहेत. असे अनेक मुद्दे सध्या चर्चेत आहेत. त्यामुळे यातील कोणत्या मुद्द्यावरुन राज ठाकरे हे सरकारला घेरतील हे बघावे लागेल.

- Advertisement -

तसेच उद्धव ठाकरे, संजय राऊत व सत्ताधारी यांच्यामध्ये नेहमीच कलगीतुरा सुरु असतो. त्यावर राज ठाकरे नेमके काय भाष्य करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुका कधीही लागू शकतात. आपण सत्तेपासून दूर नाही. त्यामुळे तयारीला लागा. आपली सत्ता येणार आहे, असे फर्मान राज ठाकरे यांनी ठाणे येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांसाठी जारी केले होते. त्यामुळे गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार याचीही सध्या चर्चा सुरु आहे.

विशेष म्हणजे शिवाजी पार्क मैदान शांतता क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. येथे सभा अथवा मेळावे घेण्यास मनाई आहे. मात्र वर्षभरातील ३० दिवस या मैदानावर कार्यक्रम घेण्यास विशेष परवानगी दिली जाते. शिवसेना-भाजप युतीच्या काळात या दिवसांमध्ये राज ठाकरे यांच्या गुढी पाडवा मेळाव्याचाही समावेश करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -