नाशिकच्या स्थानिक मनसैनिकांकडून राज ठाकरेंच्या आदेशालाच छेद

पक्षातील अंतर्गत बेबनावाला दिले जातेय सोशल व्यासपीठ; शहराध्यक्षांना घायाळ करण्यासाठी रणनीती

Mns

‘पक्षात पद नावाची गोष्ट आहे त्याचा बाज तुम्हाला राखावाच लागेल’ असा सल्ला देणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जानेवारीत झालेल्या राज्यव्यापी अधिवेशनात ‘संघटनात्मक बाबींसंदर्भात कोणतीही चुकीची बातमी माध्यमांपर्यंत, विशेषत: सामाजिक माध्यमांवर आलेली चालणार नाही, तसे आढळल्यास संबंधिताला पदावरुन बाजूला केल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा दिला होता. ठाकरे यांनी हा इशार देऊन वर्ष उलटत नाही तोपर्यंत नाशिक मनसेच्या काही सैनिकांनी त्यांच्याच शहराध्यक्षांना घायाळ करण्यासाठी ‘सोशल’ वॉर सुरु केला आहे. शहराध्यक्ष बदलाच्या कोणत्याही हालचाली सुरु नसताना तशा स्वरुपाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. त्यामुळे या मूठभर मनसैनिकांना राज ठाकरे यांच्या आदेशाचीही तमा उरलेली नाही हे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिक हा बालेकिल्ला होता. या बालेकिल्ल्यात गेल्या पंचवार्षिक काळात तब्बल ४० नगरसेवक मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते. तर शहरातील तिनही विधानसभा मतदारसंघांवर मनसेचा झेंडा फडकला होता. परंतु हे यश तत्कालीन स्थानिक पदाधिकाऱ्यांना पचवता आले नाही. एकीकडे राज ठाकरे हे संघटन वाढीसाठी जीवाचे रान करीत असताना दुसरीकडे स्थानिक पदाधिकारी मात्र गटबाजीत व्यस्त होते. एकमेकांच्या कुरघोड्या करण्यात हे पदाधिकारी धन्यता मानत होते. त्यातून पक्षाची बदनामी झालीच; शिवाय संघटन बळकटीकडेही दुर्लक्ष झाले. त्याचा राजकीय फायदा प्रतिस्पर्धी पक्षांनी उचलला आणि परिणामी पुढील निवडणुकांमध्ये मनसेच्या हाती काही उरले नाही. केवळ सहा नगरसेवक पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेत. याशिवाय तीनही आमदारांना पराभवाला सामना करावा लागला. त्यानंतर कोरोनाकाळात मनसेने पुन्हा एकदा उसंडी घेतली. या काळात शहरात मोठे काम उभे करीत गोरगरीबांना आधार दिला. लॉकडाऊनची झळ गरीब आणि सर्वसामान्यांना बसू नये म्हणून विद्यमान सर्वच पदाधिकाऱ्यांनी मोठे काम या काळात उभे केले. महत्वाचे म्हणजे हे करताना कोणतीही चमकोगीरी करायचे नाही असा आदेश राज ठाकरे यांनी काढला होता आणि त्याचे पालनही चांगले झाले. कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना दिसू लागल्यावर पक्षाने संघटन वाढीसाठी पुन्हा प्रयत्न सुरु केले. जिल्हाध्यक्षकांनी महत्वाच्या मुद्यांना हात घालत प्रशासनाला जाब विचारणे सुरु केले. डॉ. प्रदीप पवार, अशोक मुर्तडक, रतनकुमार इचम, अनंता सूर्यवंशी, दिलीप दातीर, सलिम शेख, नंदीनी बोडके यांसह ‘फादर बॉडी’तील महत्वाचे पदाधिकारी पक्ष वाढीसाठी पुरेपूर प्रयत्न करताना दिसताहेत. दुसरीकडे विद्यार्थी सेनेतील अंतर्गत गटबाजी दूर काढण्यासाठी राज ठाकरे यांनी स्वत: पुढाकार घेतला आणि नवीन  पदाधिकाऱ्यांना संधी दिली. त्याच वेळी पक्षाने विभाग स्तरावर बैठका घेत महापालिकेच्या आगामी निवडणुकीचा चाचपणी सुरु केली. याच बैठकांतून चांगल्या उमेदवारांचा शोध सुरु केला. एकीकडे पक्षात सकारात्मक घडामोडींची चलती असताना दुसरीकडे मात्र काही विघ्नसंतोषी मंडळी मात्र विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या गच्छंतीसाठी सक्रिय झाली. शहराध्यक्ष बदलाचे वारे पक्षात वाहत असल्याच्या बातम्या माध्यम प्रतिनिधींपर्यंत पोहचवल्या जाऊ लागल्या. वास्तविक, अवघ्या एका वर्षापूर्वी शहराध्यक्ष बदलण्यात आलेले आहेत. या बदलानंतर जास्तीत जास्त तरुणांना पक्षात संधी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पक्ष प्रवेशांनीही जोर धरलेला आहे. असे असताना शहराध्यक्ष बदलाच्या अफवा पसरवून विद्यमान पदाधिकाऱ्यांनाच आव्हान देण्यात येत आहे. यासंदर्भात ‘आपलं महानगर’ प्रतिनिधीने मुंबईस्थित एका पदाधिकाऱ्याशी संपर्क साधत शहराध्यक्ष बदलाबाबत पक्षाचा काही विचार आहे का याची माहिती घेतली. यावेळी अशा कोणत्याही हालचाली नसल्याची स्पष्टोक्ती संबंधितांनी दिली. त्यामुळे ही विघ्नसंतोषी मंडळी कशाच्या आधारावर शहराध्यक्ष बदलाविषयीच्या बातम्या समाज माध्यमांमध्ये टाकत आहेत असा प्रश्न आता सर्वसामान्य मनसैनिकांना पडला आहे.

झारीतील शुक्राचार्य कोण?

पक्षात सारे काही अलबेल असताना अचानकपणे गटबाजी वाढू लागल्याने त्यामागे नक्की कुणाचा हात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिकमधील कुणी अशा गोष्टींना खतपाणी देत आहे की, वरिष्ठ पातळीत कुणी झारीतील शुक्राचार्य आहे याचा शोध घेण्याचे आव्हान विद्यमान पदाधिकाऱ्यांसमोर आता उभे ठाकले आहे.

बदनामी करणाऱ्यांवर कारवाई होईल?

चुकीच्या बाबी माध्यमांपर्यंत पोहचवणाऱ्या औरंगाबाद येथील एका पदाधिकाऱ्याची मनसेच्या वरिष्ठांनी काही महिन्यांपूर्वीच हाकालपट्टी केल्याचे उदाहरण ताजे आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पक्षाची बदनामी करणाऱ्यांवर काय कारवाई होते हे बघणे आता औत्सूक्याचे ठरणार आहे.

 राज्यव्यापी अधिवेशनात काय म्हणाले होते राज ठाकरे?

मला संघटनात्मक बाबींसंदर्भात कोणतीही गोष्ट वाईट पद्धतीने पुढे आलेली चालणार नाही. मन मोकळे करायचे असले तर पक्षाचे नेते आहेत. कोणतेही माध्यम ही त्यासाठी जागा नाही. मात्र तसे करताना कुणी आढळले तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला केल्याशिवाय राहणार नाही. जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शाखाध्यक्ष यांसारख्या पदांचा बाज तुम्हाला राखावाच लागेल. पद नावाची गोष्ट आहे त्याचा बाज तुम्हाला राखावाच लागेल.