राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित

प्रकृतीच्या कारणास्तव दौरा स्थगित केल्याची माहिती, पुण्यातील सभेत मांडणार भूमिका

Doctors advise Raj Thackeray to rest

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा स्थगित झाला आहे. राज ठाकरे यांनी शुक्रवारी स्वत: ट्विट करीत ही माहिती दिली आहे. राज ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव हा दौरा स्थगित करण्यात आला आहे, मात्र पुण्यातील नियोजित सभा होणार असून या सभेत आपण सविस्तर बोलणार असल्याचेही राज यांनी स्पष्ट केले आहे.राज यांच्या दौर्‍याच्या स्थगितीवरून शिवसेनेने मात्र त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येला जाणार होते. त्यांच्या अयोध्या दौर्‍याची जोरदार तयारीही सुरू होती. ट्रेन्सही आरक्षित करण्यात आल्या होत्या, मात्र उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी या दौर्‍याला विरोध केला होता. राज ठाकरे जोपर्यंत मनसैनिकांनी मारहाण केलेल्या उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना उत्तर प्रदेशात पायही ठेवू देणार नाही, अशी भूमिका सिंह यांनी घेतली आहे. यावरून मनसे विरुद्ध बृजभूषण सिंह असा संघर्ष निर्माण होणार की काय अशीच चिन्हे होती. साध्वी कंचनगिरी यांनी यात मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र राज ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी आपला अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करीत असल्याची घोषणा केली आहे.

राज यांच्या पायाचे दुखणे बळावल्याने हा दौरा स्थगित करण्यात येत असल्याचे समजते, मात्र रविवारी २२ मे रोजी पुण्यात होणारी नियोजित सभा होणार आहे. या सभेत आपण सविस्तर बोलणार असल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपने असे का करावे? : संजय राऊत
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौरा रद्द करण्याच्या मुद्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. राज यांना अयोध्या दौर्‍यासाठी मदत लागली असती, तर शिवसेनेने ती नक्कीच केली असती. तसेच राज यांच्यावर दौरा रद्द करण्याची नामुष्की आली असे मी म्हणणार नाही, पण भाजपने असे का करावे, असा सवालही राऊत यांनी केला आहे, पण ठीक आहे. यातून काही लोकांना शहाणपण आले तर बरे होईल. त्यामुळे आपलेच नुकसान होत असते हे काही लोकांना उशिरा समजते, असेही राऊत म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा आधी ठरल्याप्रमाणेच होणार आहे. १५ जूनला आदित्य येतील. ते दर्शन घेतील. इस्कॉन मंदिरालाही आदित्य भेट देणार असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.