गेहलोत सरकारसाठी काँग्रेस रस्त्यावर, राजभवनाबाहेर काँग्रेसची निदर्शने

congress protest at rajbhavan mumbai
काँग्रेसचे राजभवनाबाहेर आंदोलन

राजस्थानातील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या समर्थनार्थ प्रदेश काँग्रेसचे नेते सोमवारी रस्त्यावर उतरले. राजस्थान राज्यपालांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करीत या नेत्यांनी भर पावसात भाजपच्या विरोधात घोषणा दिल्या. सत्ता, पैसा आणि राज्यपालांच्या कार्यालयाचा गैरवापर करून भाजप देशाच्या विविध राज्यातील विरोधी पक्षाची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हे संविधानविरोधी असून लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.

सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षाची लोकनियुक्त सरकारे पाडणे आणि अनैतिक, भ्रष्ट मार्गाने सत्ता मिळवणे हीच भाजपची कार्यपद्धती राहिली आहे. त्यासाठी राज्यपालांच्या कार्यालयांचा म्हणजे राजभवनाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात येत आहे. अनेक राज्यातील सरकारे पाडण्याची षडयंत्रे राजभवनावर शिजली आहेत. राजस्थानात राज्यपालाची भूमिका संशयास्पद आणि पक्षपातीपणाची आहे, असा आरोप थोरात यांनी केला.

तर राजस्थानातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राज्यपाल केंद्र सरकारच्या दबावाखाली वागत आहेत. दुर्देवाने राजभवन हे राजकारणाचा अड्डा बनली आहेत, अशी खंत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. या आंदोलनात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान, माजी आमदार मधु चव्हाण, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.