घरदेश-विदेश५०० वर्षांची प्रतीक्षा संपली! देशभरात रामोत्सव

५०० वर्षांची प्रतीक्षा संपली! देशभरात रामोत्सव

Subscribe

पर्णकुटीत राहणार्‍या रामलल्लासाठी भव्य मंदिर

सुमारे ५०० वर्षांची प्रतीक्षा संपवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराचे दुपारी १२.४४ च्या शुभ मुहुर्तावर विधिवत भूमिपूजन केले. त्यानंतर उपस्थितांना संबोधताना नरेंद्र मोदी म्हणाले की, ५०० वर्षांची प्रतीक्षा आज संपत आहे. त्यामुळे माझे येथे येणे स्वाभाविकच होते. पर्णकुटीत राहणार्‍या रामलल्लासाठी भव्य मंदिर उभे राहणार आहे. आज इतिहास रचला जात आहे. कन्याकुमारीपासून क्षीर भवानीपर्यंत, सोमनाथपासून काशी विश्वनाथपर्यंत, बोधगयेपासून अमृतसरपर्यंत आणि लक्ष्यद्विपपासून लेहपर्यंत आज संपूर्ण भारत राममय आणि प्रत्येक मन दीपमय आहे. एवढेच नाही, तर ‘राम काज कीन्हे बिनु मोहि कहां विश्राम’, असे म्हणत, शतकांची प्रतीक्षा आज संपत आहे. राम जन्मभूमी आज मुक्त झाली आहे. अनेकांना तर विश्वासच बसत नसेल, की ते याची देही याची डोळा राम मंदिराचे भूमिपूजन होताना पाहत आहेत. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होण्याची मला राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने संधी दिली. मी त्यांचे आभार मानतो.

आजचा हा दिवस त्याच तपाचे आमि संकल्पाचे प्रतिक आहे. राम मंदिराच्या आंदोलनात संघर्ष आणि संकल्प होता, असे मोदी म्हणाले. राम मंदिर आंदोलनात अर्पण भाव अन् संघर्ष होता. राम मंदिरासाठी चाललेल्या आंदोलनात अनेक लोकांचा अर्पण भाव होता. संघर्ष होता. त्याग, बलिदान आणि संघर्षाने आज हे यश मिळाले आहे. मी त्या सर्व लोकांना देशातील 120 कोटी नागरिकांच्यावतीने नतमस्तक होऊन नमन करतो, असे मोदी यांनी सांगितले.

- Advertisement -

इमारती नष्ट झाल्या. मात्र, रामाचे अस्तित्व नष्ट झाले नाही. बंधूंनो राम आपल्या मनात आहेत. आपल्यात एकरूप झाले आहेत. कुठलेही काम करायचे असेल तर आपण प्रेरणेच्या रुपात रामाकडेच बघतो. आपण प्रभू रामांची अद्भूत शक्ती पाहिली आहे. आपल्या संस्कृतीचे आधार स्तंभ आहेत. श्रीराम भारताची मर्यादा आहेत. श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत. याच पार्श्वभूमीवर आज अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पार पडले आहे.

राम मंदिर राष्ट्रीय भावनेचे तसेच संस्कृतीचे आधुनिक प्रतिक –
हे राम मंदिर राष्ट्रीय भावनेचे तसेच संस्कृतीचे आधुनिक प्रतिक असेल. कोटी लोकांच्या सामूहिक संकल्पतेचे प्रतिक असेल. हे मंदिर येणार्‍या पिढ्यांसाठी आस्थेचे प्रतिक असेल आणि राम मंदिराकडून आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा मिळत राहील. जेव्हा जेव्हा मानवतेने प्रभू रामचंद्रांना मान्य केले, तेव्हा विकासच झाला आहे आणि जेव्हा आपण भरकटलो तेव्हा आपला विनाश झाला आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांच्या भावनांची काळजी घेत, सर्वांना सोबत घेत, विकास करायचा आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. कोरोना काळात प्रभूरामांच्या मर्यादांचे पालन करायला हवे, असे मोदी यांनी सांगितले.

- Advertisement -

कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात श्रीरामाच्या मर्यादांचे पालन करायला हवे. दोन मीटरचे अंतर, मास्क आवश्यक आहे. देशातील जनतेला प्रभू राम, माता सीता सुखी ठेवो, याच शुभेच्छा देतो, अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या.

-पंतप्रधान नरेंद्र मोदी
यावेळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, नृत्यगोपालदास महाराज, चंपतरायजी आदी उपस्थित होते. अनेक वर्षे पर्णकुटीत राहत असलेल्या आमच्या रामलल्लांसाठी आज एक भव्य मंदिर उभारले जात आहे. तुटणे आणि पुन्हा उभे राहणे शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या या चक्रातून आज राम जन्मभूमी मुक्त झाली आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी राम जन्मभूमी आंदोलनाची सांगड स्वातंत्र्याच्या लढ्याशी अथवा आंदोलनाशीही घातली.पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्यासाठी आंदोलने झाली. 15 ऑगस्टचा दिवस त्या आंदोलनांचा आणि हुतात्म्यांच्या भावनांचे प्रतिक आहे. अगदी त्याप्रमाणेच राम मंदिरासाठीही अनेक शतके अनेक पिढ्यांनी प्रयत्न केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख
अयोध्येमधील राम मंदिराबरोबर नवीन इतिहास रचला जात आहे. त्याचबरोबर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. ज्याप्रमाणे खारीपासून वानरांपर्यंत आणि नावाड्यापासून ते वनामध्ये राहणार्‍यांपर्यंत सर्वांना प्रभू रामचंद्राच्या विजयामध्ये सहभागी होण्याचे सौभाग्य मिळाले. लहान लहान मुलांनी भगवान श्री कृष्णाला गोवर्धन पर्वत उचलल्याच्या पराक्रमामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी मावळ्यांनी सहकार्य केले, महाराज सोहेलदेव यांना लढाईमध्ये गरिबांनी आणि मागासलेल्या लोकांनी मदत केली, दलित, मागास, आदिवासींबरोबरच सर्वच स्तरातील लोकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात गांधीजींनी सहकार्य केले, त्याचप्रमाणे आज देशभरातील लोकांच्या सहकार्यामुळे राम मंदिराच्या उभारणीचे हे पवित्र काम सुरू झाले आहे,

संपूर्ण भारत राममय झाला आहे. संपूर्ण देश रोमांचित आहे, प्रत्येकजण भावूक आहे. करोडो लोकांना आज आपण हा क्षण जिवंतपणी पाहू शकत आहोत यावर विश्वासच बसत नसेल. येणार्‍या पिढीसाठी हे मंदिर आस्थेचे प्रतिक असेल. राम मंदिराकडून आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा मिळत राहील.-नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

हा तर भारताच्या नवनिर्माणाचा शुभारंभ आहे. प्रभू श्रीराम यांच्या चरित्रातील पुरुषार्थ आपल्या कणाकणात आहे. आपल्या सगळ्यात राम आहे. जगाचं कल्याण करणारा भारत स्वतःच्या कल्याणाचा शुभारंभ आज आणि या व्यवस्थेचे नेतृत्व ज्यांच्या हाती आहे, त्यांच्या हस्ते होतेय. -मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.

मर्यादा पुरूषोत्तम भगवान राम सर्वोच्च मानवीय गुणांचं स्वरूप आहे. राम आपल्या मनात खोलवर बसलेल्या मानवतेची मूळ भावना आहे. राम प्रेम आहे. ते कधीच द्वेषातून प्रकट होऊ शकत नाही. राम करूणा आहे. ते कधी क्रूरपणे प्रकट होऊ शकत नाही.-राहुल गांधी, ज्येष्ठ नेते, काँग्रेस.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -