घरमहाराष्ट्रग्रामस्थांचा विरोध डावलून रिफायनरीसाठी सर्व्हेक्षण; सत्यजित चव्हाण, मंगेश चव्हाणला अटक

ग्रामस्थांचा विरोध डावलून रिफायनरीसाठी सर्व्हेक्षण; सत्यजित चव्हाण, मंगेश चव्हाणला अटक

Subscribe

 

मुंबई : नाणार रद्द झाल्यानंतर बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरीसाठी सोमवारी २४ एप्रिल रोजी सर्व्हेक्षण होणार असून याला ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला रिफायनरी नको असून तसे ग्रामसभांचे ठराव आम्ही केले आहेत. मात्र या ठरावाला न जुमानता आणि ग्रामस्थांच्या भावनांचा विचार न करता शिंदे सरकार प्रशासनाच्या बळजबरीने माती आणि पाणी परीक्षण करत आहे, असा घणाघात बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र जोशी यांनी केला आहे. मात्र हा विरोध डावलून १६०० पोलीस आणि अधिकारी प्रशासनाने तैनात केले आहे. यातील गंभीर बाब म्हणजे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरवण्यासाठी आधीच सामजिक कार्यकर्ते सत्यजीत चव्हाण, मंगेश चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

नुकत्याच खारघर येथे झालेल्या घटनेत उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू झाला होता. राज्यातील उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढली असून लोकांना बाहेर पडणे अशक्य असताना रत्नागिरी प्रशासनाने अचानक सर्व्हेक्षणाचा निर्णय घेत ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ चालवला आहे. प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला, वृद्ध आणि मुले बाहेर पडल्यास त्यांच्या काही जीवाचे बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी शिंदे- फडणवीस सरकार घेणार आहे का? असा सवाल जोशी यांनी उपस्थित केला आहे. याआधी सुद्धा दोनदा प्रशासनाने सर्व्हेक्षणासाठी प्रयत्न केला होता. मात्र ग्रामस्थांच्या जोरदार विरोधामुळे त्यांना काढता पाय घ्यावा लागला होता. मात्र कुठल्याही परिस्थितीत यावेळी मोठ्या संख्येने पोलीस यंत्रणा हाताशी घेऊन आणि प्रचंड उष्णतेचा फायदा घेऊन सर्व्हेक्षण उरकून टाकण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

रिफायनरीच्या भीषणतेचे वास्तव मांडणाऱ्या पत्रकार शशिकांत वारीशे यांची हत्या झाल्यानंतर एकूणच या परिसरातील दहशतीचे वास्तव देशासमोर आले होते. यावेळी शिंदे सरकारने तात्पुरती मलमपट्टी करताना ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून हा प्रकल्प पुढे नेला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्याला पाने पुसताना जबरदस्तीने सर्व्हेक्षण केले जात आहे, याकडे जोशी यांनी लक्ष वेधले आहे. हे सर्व्हेक्षण करण्यापूर्वी प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत आम्ही आमचा शंभर टक्के विरोध दर्शवला होता. पण, आमचा विरोध डावलून हे सर्व्हेक्षण होत आहे. पण, आमची सुद्धा जिद्द कायम असून रिफायनरी रद्द झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी ठाम भूमिका जोशी यांनी घेतली आहे.
बारसू सोलगाव परिसरातील अशांत वातावरण पाहता आणि वाढत चाललेल्या उष्णतेचे वातावरण पाहता प्रशासनाने हे सर्व्हेक्षण ताबडतोब रद्द करावे आणि ग्रामस्थांना रिफायनरी नको असेल तर लोकांवर ती लादू नये, असे आवाहन जनता दल मुंबईचे अध्यक्ष प्रभाकर नारकर आणि प्रदेश चिटणीस संजय परब यांनी केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -