धर्माचा कोणी राजकीय बाजार भरवत असेल तर रोखलं पाहिजे, रोहित पवारांची राज ठाकरेंवर टीका

Rohit Pawar's criticism on Raj Thackeray it should be stopped If anyone do politics in religion
धर्माचा कोणी राजकीय बाजार भरवत असेल तर रोखलं पाहिजे, रोहित पवारांची राज ठाकरेंवर टीका

राज्यात धार्मिक मुद्द्यांवरुन वाद सुरु आहे. मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. या मागणीवर राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्ताधाऱ्यांकडून राज ठाकरेंवर टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीसुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. राज्यात धर्माच्या आदारावर राजकीय बाजार भरवणाऱ्यांना रोखलं पाहिजे अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. कोणाच्याही चिथावणीला बळी न पडता राज्यात शांतता राखल्याबद्दल राज्यातील जनतेचे आणि पोलीसांचे मनःपूर्वक आभार! महाराष्ट्र आणि इथला सर्व समाज हा शांतताप्रिय आणि सर्वधर्मसमभाव मानणारा आहे, हे पुन्हा एकदा पहायला मिळालं. हा आपला महाराष्ट्र धर्म आणि आपली एकजूट कायम राहील, असा विश्वास आहे. धर्म, निष्ठा, श्रद्धा हे प्रत्येकाचे व्यक्तिगत विषय आहेत. त्याचा आदर सर्वांनीच केला पाहिजे. पण त्याचा कुणी राजकीय बाजार भरवत असेल तर त्यालाही रोखलं पाहिजे. महागाईपासून बेरोजगारीपर्यंत सर्वसामान्यांना भेडसावणारे अनेक प्रश्न आज देशात आहेत. त्यावर आवाज उठवण्याची आज अधिक गरज आहे, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

राज्यात मागील काही दिवसांपासून भोंग्याचे राजकारण करून सामाजिक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न ठराविक राजकीय पक्षाकडून सुरु आहे. यावर कोणीही महाराष्ट्रात अल्टिमेटमची भाषा करू नये असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. कोणतेही सरकार हे कायदा, नियम आणि संविधानाने चालते. असे अल्टिमेटम दिल्यामुळे राज्यात शांतता टिकून राहण्यासाठी गृहमंत्र्यांनी योग्य त्या सूचना पोलीस प्रशासनाला केल्या आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने अशाप्रकारे वागणे अथवा वक्तव्य करणे बरोबर नाही असेही अजित पवार म्हणाले. भोंग्यांबाबत एखादा निर्णय ठरला तर हा निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल, त्यानुसार राज्यातील धार्मिक स्थळे, वेगवेगळ्या समाजाच्या पंथांच्या लोकांना हा नियम लागू करावा लागेल असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.


हेही वाचा : जिथे राज ठाकरेंची सभा तिथेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा; परवानगीवरून वादाची शक्यता