‘आमचे १७० वरुन २०० आमदार झाले तर विरोधकांनी दोष देऊ नये’

ShivSena MP Sanjay Raut

“ठाकरे सरकार अकरा दिवसही टिकणार नाही, असे बोलणाऱ्यांचे बारावे-तेरावे घालून या सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोरोनाचे संकट नसते तर सरकारने सहा महिने पूर्ण केले या आनंदाप्रीत्यर्थ विरोधी पक्षाला श्रीखंड-पुरीचे जेवण घालता आले असते. विरोधी पक्षाचे सध्या १०५ चे बळ आहे, ते कायम राहावे, अशा आमच्या सदिच्छा आहेत. पण सरकारचे १७० चे दोनशे झालेच तर विरोधकांनी सरकारला दोष देऊ नये”, असा टोला शिवसेनेचे मुखपत्र सामनातून लगावण्यात आला आहे.

सामनाच्या अग्रलेखातून आज पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधण्यात आला आहे. “राजभवनाच्या दारात उभे राहून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे आता नेहमीचेच झाले आहे. ही मागणी त्यांनी गुजारतेत जाऊन करण्याची हिंमत दाखवावी. महाराष्ट्रात त्याची गरज नाही. दोनेक वर्षांपूर्वी राजभवनाखाली एक ब्रिटिशकालीन भुयार सापडले. त्यात काही जुन्या गंजलेल्या तोफा वैगेरे सापडल्याचे तेव्हा सांगितले गेले. महाराष्ट्रातील सरकार पडणार असे आवाज त्या गंजलेल्या तोफांतून काढावेत असे मनसुबे कोणी रचू नयेत. जुन्या तोफा म्हणजे हवा-पाण्याची नळकांडीच ठरतात. राजभवनातील हवा-पाणी गढूळ होणार नाही यांची आम्हाला खात्री आहे.” अशी टीका विरोधकांवर केली आहे.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, “राज्यात सध्या उन्हाळा आहे, विषाणूही आहे आणि सरकार विरोधकांचा किडादेखील वळवळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर थंड मलबार हिलवरच्या राजभवनाचे वारेही गरम झाले आहेत, असे गरमागरम बातम्यांवरुन दिसते.” तसेच राजभवनाच्या दारात उभे राहून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे आता नेहमीचेच झाले आहे. ही मागणी त्यांनी गुराततेत जाऊन करण्याची हिंमत दाखवावी. महाराष्ट्रात त्याची गरज नाही, असे ठणकावण्यात आले आहे.