घरमहाराष्ट्रहाती भाजपचा झेंडा घेणंच बाकी; बिहारच्या डीजीपींवर सामनातून टीका

हाती भाजपचा झेंडा घेणंच बाकी; बिहारच्या डीजीपींवर सामनातून टीका

Subscribe

अभिनेता सुशातसिंह राजपूत मृ्त्यू प्रकरणाची चौकशीचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने काल सीबीआयला दिले. तपास सीबीआयकडे सोपवल्यामुळे मुंबई पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलीस तपासात अडथळे आणत असल्याचे विधान केले होते. तसेच न्यायालयाच्या निर्णयानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे पत्रकारांसमोर येत ‘ये न्याय की अन्याय पर जीत है,’ असे उद्गार काढले. यावरुन आता शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. बिहारच्या पोलीस महासंचालकांनी आता भाजपचा झेंडाच हाती घेणे बाकी राहिले असल्याचा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

“सुशांत प्रकरण सीबीआयकडे सोपवल्याची घोषणा होताच बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे अत्यानंदी चेहऱ्याने बाहेर आले व राजकीय निवडणूक जिंकल्याच्या आविर्भावात पत्रकारांसमोर म्हणाले, “ये न्याय की अन्याय पर जीत है.” पांडे हे भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी हाती भाजपचा झेंडा पकडून पत्रकारांशी बोलणेच काय ते बाकी होते,” असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे. “पांडे यांचे म्हणणे असे की, सुशांतप्रकरणी मुंबई पोलीस योग्य दिशेने तपास करीत नाहीत (त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र वाचावे). बिहार पोलिसांच्या तपासात अडथळे आणत आहेत.” हे त्यांचे विधान सत्याला धरून नाही,” असे सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

“सुशांतने नेमकी आत्महत्या का केली हे रहस्य उलगडण्याच्या कामी पोलीस लागलेच आहेत, पण हे रहस्य म्हणजे पाताळात दडवलेली कुपी आहे. ती कुपी फक्त बिहारचे पोलीस किंवा सीबीआयलाच शोधता येईल हा भ्रम आहे. सीबीआयने राज्यातील एखाद्या प्रकरणाचा तपास करायला हरकत नाही, पण राज्यांच्या अधिकारांवर हे आक्रमण आहे,” असे अग्रलेखामध्ये म्हटले आहे.

“बिहारमधील अनेक खून, हत्यांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला, पण त्यापैकी किती खरे आरोपी आतापर्यंत सीबीआय पकडू शकली? ब्रह्मेश्वर मुखियाने रणवीर सेना नावाची खासगी ‘फौज’ बनवली होती. त्याची हत्या होताच बिहारात दंगल उसळली. प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. मुखियाचे खरे आरोपी कोणी पकडले असतील तर सांगावे. मुझफ्फरपूरचे नवरुणा हत्याकांड असेल नाहीतर सिवानमधील पत्रकार राजदेव रंजन हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. यापैकी कोणाचेही गुन्हेगार पकडले गेले नाहीत. त्यांच्या कुटुंबांवर जो अन्याय झाला त्यावर न्याय व सत्य यांनी विजय मिळविला नाही,” असा टोला बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी लगावला आहे.

- Advertisement -

“बिहारमधल्या पोलिसांना मुंबईत क्वारंटाईन केले म्हणून सुशांत प्रकरणात संशय वाढतो असे कुणाचे निरीक्षण असेल आणि त्या आधारे तपास सीबीआयकडे दिला असेल तर आज भारताची राज्य घटना ही अश्रू ढाळत असेल. देशाला राज्यघटना आणि संघराज्य देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. मुंबई पोलिसांचा प्रामाणिकपणा शंभर नंबरीच आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पोलिसांनी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही”, असेही अग्रलेखात म्हटले आहे.


हेही वाचा – महात्मा फुले योजनेंतर्गत कोरोना उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर होणार कारवाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -