घरमहाराष्ट्र'एका नौटंक्यासाठी छाती बडवणे बंद करा'; शिवसेनेचा भाजपवर घणाघात

‘एका नौटंक्यासाठी छाती बडवणे बंद करा’; शिवसेनेचा भाजपवर घणाघात

Subscribe

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक करण्यात आली. यावरुन भाजपच्या नेत्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान, शिवसेनेने त्यांचे मुखपत्र ‘सामना’मधून प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेने राज्यातील भाजपवर टीका करताना केंद्रातील भाजपच्या नेत्यांवर देखील जोरदार प्रहार केला आहे.

“महाराष्ट्रात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची आवई भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील लोकांनी उठवली आहे. त्यांच्या जोडीला दिल्ली सरकारमधील अनुभवी शहाणेही सामील व्हावेत हे आश्चर्यच आहे. कधीकाळी ‘काँग्रेस’ गवत हे अगदी निरुपयोगी उत्पादन म्हटले जात असे. ते केवळ निरुपयोगीच नव्हे तर चांगलेच उपद्रवी असल्याचे मत तेव्हाच्या राजकीय विरोधकांकडून व्यक्त केले जात होते. त्याच गवताचा काढा करून सध्याचे भाजपवाले दिवसातून दोन वेळा पीत असावेत असे त्यांचे वर्तन आहे. मुंबईतील एका वृत्तवाहिनीचा मालक, संपादक असलेल्या अर्णब गोस्वामी यास एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली. त्याच्या अटकेचा राजकारणाशी, पत्रकारितेशी संबंध नाही. गोस्वामी यांनी टिळक-आगरकरांप्रमाणे सरकारविरोधात जहाल लिखाण केले. त्यामुळे सरकारने त्यांची गचांडी पकडली असे काही हे प्रकरण नाही. दोन वर्षांपूर्वी अलिबाग निवासी अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या आत्महत्येशी संबंधित ही अटक आहे,” अशी आठवण शिवसेनेने भाजपला करुन दिली आहे.

- Advertisement -

“गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता चौकशीत काय ते सत्य बाहेर येईल. यात ‘आणीबाणी’ आली, काळा दिवस उजाडला, पत्रकारितेवर हल्ला झाला, असे काय आहे? अर्णब गोस्वामी व त्यांची वृत्तवाहिनी कोणत्या प्रकारची पत्रकारिता करते? व त्यांच्या बरळण्यामागे कोणाची फूस आहे हे जगजाहीर आहे. सोप्या भाषेत ज्यास सुपारी पत्रकारिता म्हणावे तोच प्रकार आहे. गोस्वामी यांनी महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर प्रमुख नेत्यांच्याबाबत गरळ ओकली म्हणून त्यास अटक झालेली नाही. त्याचा संबंध एका मृत्यू प्रकरणाशी जोडला आहे व मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून ही कारवाई आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केल्याप्रमाणे ही अटक म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला वगैरे अजिबात नाही. गुजरातमध्ये सरकारविरोधी लिहिणाऱया संपादकांना अटका झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात पत्रकारांचे मुडदे पाडले गेले तेव्हा कोणाला आणीबाणीची आठवण का झाली नाही?” असा सवाल शिवसेनेने केला आहे.

“महाराष्ट्राच्या भाजपवाल्यांनी अन्वय नाईक यांना न्याय मिळावा म्हणून वाद घालायला हवा. ते मराठी मातीचे पुत्र आहेत. पण भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागली आहे. मराठी माणूस मेला तरी चालेल, पण सवतीच्या पोरास सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे असे त्यांचे धोरण स्पष्ट आहे, अशी टीका शिवसेनेने सामनामधून केली आहे. “सीतेवर आरोप होताच श्रीरामानेही सीतेवर अग्निपरीक्षेची वेळ आणली. ते तर रामराज्य होते. सीतेची अग्निपरीक्षा म्हणजे आजच्या बेगडी रामभक्तांना आणीबाणी किंवा श्रीरामाची हुकूमशाही वाटली काय? एका निरपराध माणसाची आत्महत्या त्यांच्या वृद्ध आईसह झाली. त्यांची पत्नी न्यायासाठी आक्रोश करीत आहे. पोलिसांनी कायद्याचे पालन केले. यात चौथा स्तंभ कोसळला असे सांगणारे लोकशाहीतील पहिल्या स्तंभास उखडू पाहत आहेत. एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा!” असा घणाघात शिवसेनेने भाजपवर केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -