घरमहाराष्ट्र'…तरीही भाजप पुढार्‍यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नयेत याचं आश्चर्य' -...

‘…तरीही भाजप पुढार्‍यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नयेत याचं आश्चर्य’ – शिवसेना

Subscribe

पंढरपुरच्या वारीला परवानगी मागणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांवर शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून टीकेचे बाण सोडले आहेत. “पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात लोकांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत… सर्वोच्च न्यायालयात हे वारंवार सांगावे लागत आहे… पंतप्रधान बोलत आहेत… तरीही महाराष्ट्रातील भाजप पुढारी पंढपूरच्या वारीसाठी परवानगी द्या, असं टुमणं लावून वारकऱ्यांना भडकावित आहे. सुप्रीम कोर्ट आणि पंतप्रधानांनी सांगूनही भाजप पुढाऱ्यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नयेत याचंच आश्चर्य वाटतं,” असं टीकास्त्र शिवसेनेने भाजप नेत्यांवर डागलं आहे.

महाराष्ट्रातील भाजप पुढारी यातून काही शिकणार आहेत काय?

“कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असतानाही ‘कावड यात्रे’ला योगी आदित्यनाथ यांनी परवानगी दिली. त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला झापले आहे. कावड यात्रा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे हे मान्य, पण कुंभमेळ्यापासून कावड यात्रेपर्यंत गर्दीचा पूर येतो, त्या पुरात शेवटी भक्तांचीच प्रेते वाहताना दिसतात. उत्तराखंड सरकारने कोरोना काळात कावड यात्रेवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. दोन्ही भाजपशासित राज्ये असून दोघांच्या दोन तऱहा दिसत आहेत. पण उत्तर प्रदेशातील कावड यात्रेची दखल घेऊन शेवटी सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला हे महत्त्वाचे. महाराष्ट्रातील भाजप पुढारी यातून काही शिकणार आहेत काय?” असा सवाल शिवसेनेने केला आहे.

- Advertisement -

तर अशा लोकांवर गंगामाईचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही…

“पंढरपूरची वारी असेल नाहीतर हरिद्वारची कावड यात्रा… भक्तांचे प्राण महत्त्वाचे आहेत. देवाच्या दरबार राज्यकर्त्यांना जाब द्यावा लागेल… भारतीय पक्ष भारतीय जनता पक्षाची तडफड आणि तगमग आपण समजू शकतो… त्यांना फक्त लोकांची डोकी भडकावून राजकारण करायचे आहे… सुप्रीम कोर्टापासून पंतप्रधान मोदींपर्यंत सगळ्यांचे म्हणणे आहे की, निर्बंध पाळा… तिसऱ्या लाटेपासून सावध राहा पण महाराष्ट्र भाजपचे राजकारण दुसर्‍या टोकाचे… ते सुप्रीम कोर्ट व पंतप्रधानांनाही जुमानत नाही असे दिसते… गंगेच्या प्रवाहात श्रद्धाळूंचे मृतदेह वाहातच रहावेत हीच त्यांची भावना असेल तर गंगामाईचा कोप अशा लोकांवर झाल्याशिवाय राहणार नाही…” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -