विशेष शाळेतील शिक्षकांना मिळणार वेतन

लॉकडाऊन झाल्यापासून विशेष शाळेतील शिक्षकांना वेतन मिळणे बंद झाले होते.  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे आता विशेष शाळेतील शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.

special school

विशेष शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना नियमित वेतन देण्याच्या सूचना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी दिल्या. तसेच विशेष शाळेतील कर्मचार्‍यांच्या वेतनाची जबाबदारी त्यांनी प्रधान सचिव आणि आयुक्तांवर सोपवत तातडीने वेतन काढण्याचे निर्देश दिले. लॉकडाऊन झाल्यापासून विशेष शाळेतील शिक्षकांना वेतन मिळणे बंद झाले होते.  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे आता विशेष शाळेतील शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.

समाजिक विभाग अंतर्गत येणार्‍या विशेष शाळांच्या प्रश्नांबाबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या प्रतिनिधींनी बुधवारी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. या बैठकीला प्रधान सचिव, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सहाय्यक आयुक्त, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, विशेष शाळा युनिटचे विजय साबळे उपस्थित होते. यावेळी विशेष शाळेतील शिक्षकांना वेतन सुरू करण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये ज्या शाळांचा परवाना नूतनीकरण झाला नसल्यामुळे वेतन व अन्य गोष्टी थांबल्या आहेत. अशा १७६ शाळेना सरकार स्वत:हून परवाने देऊन त्यांच्या कर्मचार्‍यांचे वेतन नियमित सुरू करेल, असे मुंडे यांनी सांगितले. त्याचबरोबर सातवा वेतन आयोगाचे अंतिम टप्प्यात असलेले काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या. त्याचबरोबर विशेष शिक्षकांना अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच शाळेत बोलवणे, अन्यथा मुलांना शिकवण्याचे काम वर्क फ्रॉम होम असेल. मुख्याध्यापकांनी शिक्षकांना शाळेत हजर राहण्यासाठी जबरदस्ती करू नये, अशा सूचनाही मुंडे यांनी यावेळी दिल्या.