समीर वानखेडेंनीच माझ्या घरात ड्रग्ज ठेवून मला अडकवलं; २० वर्षीय तरुणाचा जामीन अर्जात आरोप

NCB Sameer Wankhede

एनसीबीचे मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढत होताना दिसत आहे. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला एका २० वर्षीय तरुणाने वानखेडे यांच्यावर गभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी माझ्यात घरात ड्रग्ज ठेवल्याचा आरोप करत न्यायालयाकडे तरुणाने जामीनाची विनंती केली आहे.

समीर वानखेडे यांच्यावर ज्य तरुणाने आरोप केले आहेत त्या तरुणाचं नाव झैद राणा असं आहे. एप्रिल महिन्यात झैदच्या ओशिवरा येथील घरातील ड्रॉवरमध्ये आणि स्कूटरवर गांजा, चरस आणि इतर अमलीपदार्थ एनसीबीनं जप्त केले होते. या प्रकरणी राणा आणि त्याचा मित्र सोनू फैजला अटक केली. दरम्यान, आर्यन खान प्रकरणानंतर वानखेडे यांच्यावर होत असलेल्या आरोपानंतर धाडस करून संबंधित तरुणानं आपल्या जामीन अर्जात हा आरोप केला आहे.

वादातून मला अडकवलं

झैदच्या ओशिवरा येथील घराच्या बाजुलाच वानखेडे कुटुंबाचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट भाड्यानं दिलेला असून वानखेडे यांचे भाडेकरू आणि झैद राणा याच्या आई-वडिलांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. त्या भांडणाचा राग मनात ठेवून वानखेडे यांनी मला ड्रग्ज प्रकरणात अडकवलं असून वानखेडे यांनी स्वत: माझ्या घरात ड्रग्ज ठेवलं होतं, असा आरोप झैद राणाने केला आहे.