घरमहाराष्ट्रसमीर वानखेडे उद्या सीबीआय चौकशीला हजर राहणार; २२ मे पर्यंत अटकेपासून संरक्षण

समीर वानखेडे उद्या सीबीआय चौकशीला हजर राहणार; २२ मे पर्यंत अटकेपासून संरक्षण

Subscribe

 

मुंबईः आयआरएस अधिकारी समीर वानखेडेंना २२ मे २०२३ पर्यंत अटकेची कोणतीही कारवाई करु नका, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी central bureau of investigation (CBI) ला दिले. याप्रकरणी न्यायालयाने CBI व narcotics control bureau (NCB) नोटीस जारी करत प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. वानखेडेंनी तपासात सहकार्य करावे, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. समीर वानखेडे हे उद्या, शनिवारी सीबीआय चौकशीला हजर राहतील, असे वरीष्ठ वकील रिझवान मर्चंट यांनी सांगितले.

- Advertisement -

cruise drugs प्रकरणातून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी तत्कालीन NCB अधिकारी समीर वानखेडेंनी २५ कोटींची लाच मागितली असा आरोप करत CBI ने गुन्हा नोंदवला. समीर वानखेडेंच्या घरावरही छापा टाकण्यात आला. CBI ने चौकशीसाठी समीर वानखेडेंना समन्सही जारी केले. याविरोधात समीर वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

दिल्लीत सीबीआयने नोंदवलेला गुन्हा रद्द करावा. या गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल करु नये. सीबीआय तपासाला स्थगिती द्यावी. मला अटक न करण्याचे आदेश सीबीआयला द्यावेत, अशी मागणी समीर वानखेडेने याचिकेत केली आहे. या याचिकेत केंद्रीय गृहमंत्रालय, CBI, NCB व महाराष्ट्र शासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेवर सुट्टीकालीन न्या. शर्मिला देशमुख व न्या. आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात वरीष्ठ वकील मर्चंट यांनी वानखेडेची बाजू मांडली. या प्रकरणात समीर वानखेडेला जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे. त्याने कोणत्याही प्रकारची लाच मागितलेली नाही. वानखेडे नियमानुसारच काम करत होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात सीबीआयने नोंदवलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी वरीष्ठ वकील मर्चंट यांनी केली.

- Advertisement -

या याचिकेचे प्रत्युत्तर सादर करण्यासाठी CBI ने एक आठवड्याची मुदत मागितली. न्यायालयाने वानखेडे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. तसेच तपासाला सहकार्य करा,असेही न्यायालयाने वानखेडे यांना सांगितले आहे. ही सुनावणी येत्या सोमवारपर्यंत तहकूब केली जात आहे. तोपर्यंत वानखेडे यांना अटक करु नका, असे न्यायालयाने CBI ला सांगितले. आम्ही वानखेडे यांना अटक करणार नाही, असे CBI ने न्यायालयात स्पष्ट केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -