घरमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर 'संमोहन'; हे आहे अपघातांचे कारण?

समृद्धी महामार्गावर ‘संमोहन’; हे आहे अपघातांचे कारण?

Subscribe

 

नागपूरः समृद्धी महामार्गावर ‘संमोहन’ असल्याने येथे अपघात होत आहेत, असा निष्कर्ष नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेने काढला आहे. संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या ट्रांसपोस्टेशन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा अभ्यास केला. तीन महिने केलेल्या संशोधनातून विविध निष्कर्ष काढण्यात आले.

- Advertisement -

या निष्कर्षातील ‘महामार्ग संमोहन’ ही बाब धक्कादायक आहे. जेव्हा एखादा महामार्ग सरळ असतो. कोणत्याही अडथळ्याशिवाय तुम्ही वाहन सरळ चालवत असता. तेव्हा शरीराची हालचाल होत नाही. मेंदू प्रतिक्रियेसाठी सक्रिय नसतो. त्या मानवी स्थितीला महामार्ग संमोहन असे म्हणतात. हाच प्रकार समृद्धी महामार्गावर घडत आहे. वाहन सरळ चालत असल्याने चालकाचा मेंदू प्रतिक्रियेसाठी सक्रिय नसतो. त्यामुळेच अपघात घडल्यावर बळी जातो. समृद्धी महामार्गावर ३३ टक्के अपघात असेच घडले आहेत, असा निष्कर्ष अहवालात नमूद करण्यात आला आहे.

तसेच समृद्धी महामार्गावरील लेन कटिंगचे प्रकारही अपघातांचे प्रमुख कारण आहे. या महामार्गावर तीन पदरीचे दोन स्वतंत्र ट्रॅक आहेत. परिणामी समोरासमोर वाहन धडकून अपघात होणे अशक्य आहे. महामार्गावर झालेले अपघात हे साईड डॅशमुळे झाले आहेत. एक लेन सोडून दुसऱ्या लेनवर जात असताना नियमांचे पालन होत नाही. अशावेळी मागून वेगाने येणाऱ्या वाहनाला अचानक वाहनाची दिशा बदलावी लागते. या गडबडीतच अपघात होतात. कारण चालक महामार्ग संमोहनाच्या प्रक्रियेत गेलेला असतो. साईड डॅशमुळे झालेल्या अपघाताचे प्रमाण ४० टक्के आहे.

- Advertisement -

या अहवालात वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांचा तपशील देण्यात आला आहे. ३० टक्के छोटी वाहने व २० टक्के मालवाहतूक वाहने वेग मर्यादेचे पालन करत नाहीत. तर ५१ टक्के ट्रकचालक लेनची शिस्त पाळत नाहीत. टायर फुटण्याचे प्रकारही महामार्गावर होतात. यानेही अपघात होतो. जुने किंवा दर्जेदार टायर नसल्याने सिमेंटच्या रोडवर ते हमखास फुटतात व अपघात होतो. टायर फुटल्याने ३४ टक्के अपघात झाले आहेत. चालकाचे लक्ष विचलीत झाल्याने २४ टक्के तर मोबाइलचा वापर केल्याने ८ टक्के अपघात समृद्धी महामार्गावर झाले आहेत, असा निष्कर्ष अहवालात नमूद करण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी अहवालात उपायही सुचवण्यात आले आहेत. संमोहनापासून बचाव करण्यासाठी ठराविक अंतरावर साईनबोर्ड लावण्यात यावेत. साईनबोर्डमुळे चालकाचा मेंदू सक्रिय राहिल. लेन कटींगची शिस्त लावण्यासाठी स्वतंत्र साईनबोर्ड लावावेत. स्पीड नियंत्रक कॅमेरा व सीसीटीव्ही कार्यरत ठेवावेत, जेणेकरुन चालक वेगमर्यादा ओलांडणार नाहीत, अशी सुचना अहवालात करण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -