रेतीमाफियाचा उच्छाद; तहसीलदारावर चढवला ट्रक

अमरावतीमध्ये रेतीमाफियांनी तहसीलदाराच्या गाडीवर ट्रक चढवला. ट्रक थांबवण्याचा इशारा केल्यानंतर रेतीमाफियांनी पळ काढण्याच्या हेतून ट्रक पळवला.

sand mafia
रेतीमाफियांचा धुमाकूळ

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील प्रभारी उपविभागीय अधिकारी तसेच धामणगावचे तहसीलदार रेतीमाफियाचा पाठलाग करीत असताना रेसीमाफियाने थेट त्यांच्या सरकारी मोटारीवरच ट्रक चढविल्याची धक्कादायक घटना सोमवार, १९ नोव्हेंबर दुपारी चांदूर रेल्वे तालुक्यातील सातेफळ फाट्याजवळ घडली. या अपघातात एसडीओंसह दोघे जखमी झाले आहे. या घटनेत तहसीलदारांची गाडी ४० फुटांपर्यंत फेकली गेली.

पोलीस शिपाईदेखील उपस्थित

चांदूर रेल्वे तालुक्यातून अवैध रेती वाहतूक अनेक दिवसांपासून जोरात सुरु आहे. परंतू स्थानिक पोलिस आणि महसून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. अशातच नव्यानेच चांदूर रेल्वे येथील उपविभागिय अधिकारी पदाचा प्रभार सांभाळणारे धामणगाव रेल्वेचे तहसीलदार अभिजीत नाईक (वय ४०) सोमवारी शासकीय वाहन टाटा सुमोने धामणगाववरून चांदूर रेल्वे एसडीओ कार्यालयात येत होते. यावेळी गाडीमध्ये शिपाई प्रकाश बठे आणि गाडीचालक महेंद्र नागोशे होते.

हात दाखवताच ट्रक चढवला

अभिजीत नाईक यांनी ट्रकला ओव्हरटेक करून थांबण्याचा इशारा केला. त्यामुळे रेतीच्या ट्रकला थांबवण्यासाठी शिपाई प्रकाश बठे यांनी हात दाखवला. मात्र ट्रक चालकाने सरळ आमच्या गाडीवर ट्रक चढवला. त्यानंतर काय झाले कळलेच नसल्याचे चालक महेंद्र नागोशे यांनी सांगितले.

तहसीलदाराला गंभीर दुखापत

राज्य महामार्गावरून त्यांना रेतीचा ट्रक भरधाव जाताना दिसला असता, त्यांनी या ट्रकचा पाठलाग केला. ट्रकला ओव्हरटेक केल्यानंतर रेतीमाफियाने आपला ट्रक नाईक यांच्या वाहनावरच चढवला. यात नाईक यांच्या पाठीला, हाताला दुखापत झाली, तर चाहक महेंद्र नागोसे यांच्याही पाठीला मार बसला. कर्मचारी बठे यांना डोक्याला दुखापत झाली. या अपघातात मोटारीचा चेंदामेंदा झाला. घटनास्थळावरून ट्रकचालकाने पळ काढला. एका वाहनाने जखमी नाईक, बठे आणि नागोशे यांना तत्काळ चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रेतीमाफियाने जाणीवपूर्वक जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नाईक यांनी पोलिसांत नोंदवली आहे.