घरताज्या घडामोडीअंगावर यायचे तर या, पण जाताना खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, शिवसेनेचा हल्लाबोल

अंगावर यायचे तर या, पण जाताना खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, शिवसेनेचा हल्लाबोल

Subscribe

शिवसेना आव्हानांच्या छाताडावर चढून उभी राहिली, पण त्या राजकीय विरोधकांनीही कधी शिवसेना भवन फोडण्या-तोडण्याची भाषा केली नाही

अंगावर यायचे असेल तर या पण तेवढी मर्दानगी अंगाल असेल तर पण एक लक्षात ठेवा, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावर जाण्याची वेळ येईल असा सज्जड इशारा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून देण्यात आला आहे. भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली होती. याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही थापडीची भाषा केली होती. तर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेकडून अंगावर येण्याची भाषा केली आहे. जाणून घ्या काय म्हटलं आहे सामना अग्रलेखात

पंगा घेणारा जन्माला यायचा आहे

शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे. बाटगे आणि शिखंडींच्या टोळ्या हाताशी धरून मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या कोण टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय बेवड्यांचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय राहाणार नाही! तरीही अंगावर यायचे असेल तर या; अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर! पण एक लक्षात ठेवा, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल. त्यासाठी येताना ‘खांदेकरी’ही घेऊन या. महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्यांना खांद्यावरच जावे लागते, हा इतिहासच असल्याचे सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisement -

भाजपातील बाटग्यांचे महामंडळ

भारतीय जनता पक्षातील बाटग्यांचे महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच! कशात काही नसताना झुरळांच्या तांडय़ासारखे आपापल्या खुराडय़ाच्या गच्चीवर येऊन नरडी फुगवून प्रवचने झोडणारे हे पोंगा पंडित! कालपर्यंत पुणा दुसऱ्यांच्या बॅगा उचलून गुजराण करीत होते. आज पोटापाण्यासाठी आणखी पुणाचे तरी जोडे उचलत आहेत! असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही.

विरोधकांनी कधीच अशी भाषा केली नाही

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे. त्यांची पावले ज्या पद्धतीने वेडीवाकडी पडत आहेत त्यावरून हे स्पष्ट होते. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या शिवसेना भवनाकडे ज्या कोणी वाकडय़ा नजरेने पाहिले ते यच्चयावत नेते व त्यांचे पक्ष वरळीच्या गटारात वाहून गेले. ते पुन्हा कधीच कुणाला सापडू शकले नाहीत. ‘शिवसेना भवन फोडू’ अशी भाषा भाजपमधील काही बाटग्या टिनपाट मंडळींनी करावी व व्यासपीठावरील मराठी पुढाऱ्यांनी त्यावर टाळ्या वाजवाव्यात ही महाराष्ट्र अस्मितेची गद्दारीच नाहीतर काय? शिवसेनेशी राजकीय मतभेद असणाऱ्या अनेकांनी शिवसेनेस वेळोवेळी आव्हाने दिली. शिवसेना त्या आव्हानांच्या छाताडावर चढून उभी राहिली, पण त्या राजकीय विरोधकांनीही कधी शिवसेना भवन फोडण्या-तोडण्याची भाषा केली नाही असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -