घरमहाराष्ट्रइयत्ता तिसरी, पाचवीचे वर्ग शुक्रवारी भरणार

इयत्ता तिसरी, पाचवीचे वर्ग शुक्रवारी भरणार

Subscribe

‘नॅस’साठी एक दिवस भरणार शाळा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण भागात चौथीपर्यंतचे तर शहरी भागामध्ये सातवीपर्यंतचे वर्ग अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. मात्र, केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशभरात एकाच वेळी करण्यात येणार्‍या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी 12 नोव्हेंबरला मुंबईसह राज्यातील शाळांमध्ये इयत्ता 3 री, 5 वी, 8 वी आणि 10 वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या वर्गांमधील विद्यार्थी व शिक्षकांची 100 टक्के उपस्थिती बंधनकारक आहे. त्यामुळे राज्यात एका दिवसासाठी इयत्ता 3 री व 5 वीचे वर्ग सुरू होणार आहेत.

केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशभरात एकाचवेळी 12 नोव्हेंबरला राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणासाठी राज्यातील शाळांच्या दिवाळीच्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकातही अचानक बदल करण्यात आला. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021च्या अंमलबजावणीबाबत दिलेल्या सूचनांमध्ये आवश्यक पूर्वतयारी, सर्वेक्षणाच्या दिवशी करावयाच्या कार्यवाहीबाबतची विस्तृत माहिती तसेच फिल्ड इन्व्हेस्टिगेटर आणि ऑब्झर्व्हरसाठी सर्वेक्षणाच्या दिवशीचे वेळापत्रक शाळांना पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

या वेळापत्रकानुसार सर्वेक्षण हे ठरलेले नियमांमध्ये पूर्ण करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाने अद्यापही राज्यात ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी ग्रामीण भागात तिसरीच्या आणि शहरी भागात तिसरी, पाचवीच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलावताना पालकांचे संमतीपत्र घ्यायचे का? किती पालक विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पाठविणार असे अनेक प्रश्न शिक्षक मुख्याध्यापक वर्गातून उपस्थित होत आहेत. मात्र, ही परीक्षा घेण्यासाठी आवश्यक सर्व वर्गातील विद्यार्थी पूर्ण क्षमतेने उपस्थित राहतील अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारतर्फे राज्यातील शाळांची निवड करण्यात आली असून, मुंबईतील महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणार्‍या 140 शाळा व शिक्षण निरीक्षक (बृहन्मुंबई शहर व उपनगरे) यांच्या अखत्यारित येणार्‍या 152 शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांमधील मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती 100 टक्के ठेवणे बंधनकारक असणार आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांना शाळेत बोलावताना कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घेणे गरजेचे असल्याच्याही सूचना मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी शाळांना दिल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रात सर्वेक्षणासाठी निवडलेल्या सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमाच्या शाळातील तिसरी, पाचवी, आठवी व दहावीचे वर्ग 12 नोव्हेंबरला सुरू ठेवण्याबाबत तसेच या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक 100 टक्के उपस्थिती ठेवण्यास पालिका आयुक्तांकडून मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -