घरCORONA UPDATEअखेर शाळांचा निर्णय झाला! मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केलं शिक्कामोर्तब!

अखेर शाळांचा निर्णय झाला! मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केलं शिक्कामोर्तब!

Subscribe

गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यातल्या शाळा लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बंद आहेत. या लॉकडाऊनमध्येच बच्चेकंपनीच्या परीक्षा आणि पूर्ण उन्हाळ्याची सुट्टी देखील ‘लॉक’ झाली. मात्र, आता पुढच्या वर्षाच्या शाळा सुरु करण्याचं काय? याबाबत मोठा संभ्रम विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये होता. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यावर निर्णय घेतला आहे. १५ जूनपासून म्हणजेच आजपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, असं असलं, तरी प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यावर सरकारने काही अटी घातल्या आहेत. तसेच, या शाळा कोणत्या भागात सुरू करण्यात याव्यात, यावर देखील सरकारने काही निर्बंध घातले आहेत.

- Advertisement -

सरकारने लागू केलेल्या निर्बंधांनुसार १५ जूनपासून म्हणजेच आजपासून महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर डिजिटल माध्यमातून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वात आधी पालक आणि शिक्षकांच्या मनातला संभ्रम या निर्णयामुळे कमी झाल्याची अपेक्षा आहे. तसेच, प्रत्यक्ष शिक्षणासंदर्भात देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याच्या ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष शाळा भरवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यासोबतच दूरच्या भागातल्या शाळा आणि ग्रामीण भागातल्या शाळा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ग्राम करोना प्रतिबंधक समिती, शिक्षकांवर मोठी जबाबदारी

शाळा सुरु करण्यासाठी आता सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समित्यांची सभा आयोजित केली जाईल, गावांमधील कोविड प्रतिबंध समिती तसेच स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल, शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय आदि कामे केली जातील. गटागटाने पालक सभा घेऊन पालकांच्या मनातली भीती कमी करण्यात येईल. बाल रक्षक व शिक्षकांनी शाळाबाह्य होण्याची शक्यता असलेल्या तसेच स्थलांतरितन मजुरांच्या मुलांच्या घरी जाऊन त्यांचे मन वळवायचे आहे, सरल प्रणाली अद्ययावत करणे व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक भरणे, ग्राम पंचायतीच्या मदतीने टीव्ही, रेडीओ यांची व्यवस्था करणे जेणे करून कुठलीच सोय नसलेल्या मुलांना शिक्षणासाठी याची मदत होईल, गुगल क्लास रूम, वेबिनार डिजिटल प्रायोगिक तत्वावर सुरु करणे, ई शैक्षणिक साहित्य निर्मिती, सायबर सुरक्षा, दीक्षा मोबाईल एपचा उपयोग, शाळेच्या स्पीकरवरून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती देत राहणे अशा बाबींवर चर्चा झाली.

- Advertisement -

सुरू करण्याचे नियोजन

रेड झोन मध्ये नसलेल्या ९वी, १०वी आणि १२ वी शाळा-कॉलेज जुलैपासून, ६ वी ते ८ वी ऑगस्ट पासून, वर्ग ३ ते ५ सप्टेंबरपासून, वर्ग १ ते २ री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, इयत्ता ११ वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काही कंपन्यांनी इतर राज्यांत प्रयोग केले आहेत त्याचीही परिणामकारकता तपासावी असे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्र्यांशी बोलणार

यावेळी बोलताना मंत्री वर्ष गायकवाड यांनी प्राधान्याने दूरदर्शन आणि आकाशवाणीचा उपयोग करून घेण्याची विनंती केली. माहिती व नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी आपण यासंदर्भात लगेच बोलून ही माध्यमे देखील उपलब्ध करून घेतली जातील असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

पहिली, दुसरीसाठी ऑनलाईन नाही

ऑनलाईनबाबत पालकांच्या मतांचा विचार करण्यात आलेला आहे. पहिली व दुसरीची मुले लहान असतात, त्यांच्यासाठी ऑनलाईन पर्याय दिला जाणार नाही. ३ ते ५ वीच्या मुलांना दररोज १ तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाईन, डिजिटल शिक्षण देण्याचे नियोजन आहे अशी माहिती वर्ष गायकवाड यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -