घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशोध बेपत्ता मुलींचा : बेपत्ता मुलींचा होतोय परराज्यात व्यापार; मानवी तस्करीची मोठी...

शोध बेपत्ता मुलींचा : बेपत्ता मुलींचा होतोय परराज्यात व्यापार; मानवी तस्करीची मोठी साखळी

Subscribe

नाशिक : शहरात चार महिन्यात ७३५ महिला आणि २२१ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब ‘माय महानगर’ने प्रसिद्ध केल्यानंतर सर्वत्र याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. याच वृत्ताचा पाठपुरावा करीत पोलिसांशी संपर्क साधला असता बेपत्ता असलेल्या काही मुली व महिलांचा मानवी तस्करीसाठी वापर होत असल्याचे समोर आले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन मुस्कानअंतर्गत काही महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशातून एका मुलीची सुटका करत आंतरराज्य टोळीला अटक केली. या टोळीतील तीन महिलांनी पंचवटी व सातपूरमधील अल्पवयीन मुलींना फूस लावून नेल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मुलींची विक्री करून त्यांच्याकडून इंजेक्शन देऊन बळजबरीने देहव्यापार करून घेतला जात असल्याची बाबही यानिमित्ताने पुढे आली आहे.

राज्यातील महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याची बाब पुढे आली असतानाच नाशिक शहरात जानेवारी ते ८ मे २०२३ या कालावधीत तब्बल ९५६ मुली व महिला बेपत्ता झाल्या आहेत. पोलिसांना अवघ्या ३१ अल्पवयीन मुलींचा शोध लागला आहे. उर्वरित बेपत्ता मुली व महिलांचा शोध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (अ‍ॅण्टी ह्युमन ट्रॅफिक युनिट), मध्यवर्ती गुन्हे शाखेसह पोलीस ठाणेनिहाय पोलीस अधिकारी व कर्मचारी घेत आहेत.

- Advertisement -

राज्यात मानवी तस्करी करणार्‍या अनेक टोळ्या सक्रिय आहेत. कमी वेळेत भरमसाठ पैसा कमावण्यासाठी तस्करी केली जात आहे. मानवी तस्करीमध्ये सर्वाधिक अल्पवयीन मुली व तरुणींचा समावेश आहे. मुलींकडून देहव्यापार करवून घेणे, बालविवाह लावून देणे, मुलांना भीक मागायला लावणे, नवजात बाळाची विक्री करणे, मुलींकडून घरगुती कामे करून घेतली जात आहेत. २०२२ मध्ये एनसीआरबीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात मानवी तस्करीचे ३२० गुन्हे दाखल आहेत.

गरीब कुटुंबियांना हेरून काही रक्कम देऊन त्यांच्या अल्पवयीन मुलींना देहव्यापार आणि लग्न करण्यासाठी अन्य राज्यात नेले जाते. मॉडेलिंग, चित्रपट व मालिकांमध्ये काम करण्याचे आमिष दाखवून मुंबईत नेले जाते. या ठिकाणी मुलींची विक्री करून त्यांच्याकडून इंजेक्शन देवून बळजबरीने देहव्यापार करून घेतला जातो. निफाड तालुक्यातील ओझरमधून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ओझर पोलिसांनी तपास सुरु केला असताना जिल्ह्यात मुली व महिलांना फूस लावून पळविणारी आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याचे समोर आले. पोलिसांनी मुस्कान ऑपरेशन राबवत अल्पवयीन मुलीची मध्यप्रदेशातून सुटका करत पाच जणांना अटक केली. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या महिलांनी सातपूर व पंचवटीतील मुलींना फूस लावून पळवून नेल्याची कबुली दिली आहे.

वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांच्या पुनर्वसनासाठी करताना अनेक बाबी समोर आल्या आहेत. अल्पवयीन मुली व महिला परजिल्हा किंवा परराज्यात पळून जातात. पळून गेलेल्या अनेक मुली व महिलांचा मानवी तस्करीसाठीही वापर केल्याचे समोर आले आहे.: आसावरी देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या

आंतरराज्य टोळीने ओझरमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मध्यप्रदेशात विक्री केली होती. पोलिसांनी वेगाने तपास करत ९ जणांन अटक केली असली तरी सूत्रधार अद्यापपर्यंत फरार आहे. टोळीला अटक करताना मध्यप्रदेशातील नागरिकांनी हल्ला केला होता. त्याने अनेक मुलींची विक्री केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचा पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेतला जात आहे. : अनुपम जाधव, पोलीस, ओझर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -