10 सप्टेंबरपासून सुरू होणार कास पठारावरील हंगाम, ‘या’ तारखेपासून सुरू होणार ऑनलाईन बुकिंग

KAS_PATHAR

सातारा – जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठारावरील हंगामाची सुरूवात 10 सप्टेंबरपासून होणार आहे. कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांना यावर्षी खुले करण्यात येणार आहे. येत्या 9 सप्टेंबरपासून ऑनलाईन बुकिंग सुरू होणार असल्याचा निर्णय वनसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ही हंगामाच्या नियोजनांची बैठक बुधवारी पार पडली.

कास पठाराची आज सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पहाणी केली. येणाऱ्या काही दिवसात हे पठार फुलांनी बहरू लागणार असल्यामुळे हा दौरा करण्यात आला. दौऱ्यात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी जिल्हा पोलिस प्रमुख अजकुमार बन्सल, पर्यटनमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक गौतम पठारे, उपप्रादेशीक परिवहन विभागाचे वरिष्ठ, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

दौऱ्यात झाले हे निर्णय –

  • शनिवार 10 तारखेपासून कासचा हंगाम सुरू होणार
  • 9 तारखेपासून ऑनलाईन बुकिंग सेवा सुरु होणार
  • पर्यटकांना कास परिसरात वाहने घेऊन जाता येणार नाहीत
  • पुण्याच्या पीएमपीएल विभागामार्फत पर्यटकांसाठी इलेक्ट्रीक बस उपलब्ध होणार
  • परिसरातील ग्रामस्थांची या इलेक्ट्रिक बसमध्ये गाईड म्हणून नियुक्ती करणार
  • कास पठाराला संरक्षणाच्या नावाखाली जाळ्या उभारल्या आहेत त्या तात्काळ काढाव्यात
  • एमटीडीसी मार्फत शौचालये उभी केली जाणार

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात उमलणारी फुले ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हळू हळू दिसू लागली आहेत. काही दिवसातच हा संपूर्ण परिसर हा विविध फुलांच्या छटांनी बहरेल आणि पर्यटकांची गर्दी होईल. त्या पूर्वी परिसरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह कास पठारची पहाणी केली.