घरमहाराष्ट्रसेनेचा ७ मार्चला चलो अयोध्या

सेनेचा ७ मार्चला चलो अयोध्या

Subscribe

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा ७ मार्चला अयोध्याला जाणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यासंबधी घोषणा शनिवारी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर उद्धव ठाकरे प्रथम अयोध्येला गेले होते. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे अयोध्यला जाणार आहेत.

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीनंतर लगेचच त्यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आपली भूमिका जाहीर करीत सीएए कायद्याला एकप्रकारे पाठिंबा दिला होता. त्यानंतर लगेचच शनिवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राऊत यांनी केलेल्या ट्विटनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सविस्तर दौर्‍याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

- Advertisement -

येत्या ७ मार्च रोजी उद्धव ठाकरे अनेक शिवसैनिकांसह अयोध्येला जाणार आहेत. ७ मार्च रोजी ते अयोध्येत दुपारी श्रीरामाचे दर्शन घेतील. त्यानंतर संध्याकाळी शरयू नदीच्या तीरावर महाआरती करतील. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्यात सामील व्हा, असे आवाहन यावेळी संजय राऊत यांनी केले आहे. राऊत यांनी केलेल्या या आवाहनाला शिवसैनिक किती प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून शुक्रवारीच राम मंदिराच्या मुद्यावरुन भाजपाला कानपिचक्या देण्यात आल्या होत्या. राम मंदिराचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे. त्याला कुणाचीच हरकत नाही. पण राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सपा नेते मुलायमसिंह यादव यांनाही बोलावण्यात यावे, असा सल्ला शिवसेनेने भाजपला दिला होता. तसेच राम मंदिर ट्रस्टमध्ये शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांना डावलण्यात आल्याबद्दल या अग्रलेखातून अप्रत्यक्ष टीकाही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या या दौर्‍याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून या दौर्‍याबाबत महाविकास आघाडीची काय भूमिका राहिल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -