घरमहाराष्ट्रशिंदे गट, शिवसेनेत निवडणूक आयोगासमोर होणार सामना

शिंदे गट, शिवसेनेत निवडणूक आयोगासमोर होणार सामना

Subscribe

खरी शिवसेना नेमकी कुणाची यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू असतानाच निवडणूक आयोगाने याप्रकरणी आता सुनावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाकडून या दोन्ही गटांना आपले म्हणणे मांडण्यासाठी ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

खरी शिवसेना नेमकी कुणाची यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू असतानाच निवडणूक आयोगाने याप्रकरणी आता सुनावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाकडून या दोन्ही गटांना आपले म्हणणे मांडण्यासाठी ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेनेत आता थेट ‘सामना’ होणार असून शिवसेना नेमकी कुणाची याचा फैसला लवकरच होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार त्यांच्यासोबत फुटून बाहेर पडले, मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ आणि संसदेत आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करीत संपूर्ण शिवसेना पक्षावरच आपला दावा सांगितला होता. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण चिन्ह हे आपल्याला मिळावे, अशी विनंती केली होती, तर दुसरीकडे शिवसेनेकडूनही निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात कॅव्हेट दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

या सगळ्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोग सक्रिय झाला असून त्यांच्याकडून शिवसेना नेमकी कुणाची याचा सोक्षमोक्ष लावला जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मुदत दोन्ही गटांना दिली आहे. त्यानंतर निवडणूक आयोग याप्रकरणी सुनावणी करणार असल्याचे समजते. निवडणूक आयोगाचा कौल काय असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने शिवसेनेत उभी फूट पडल्याचा दावा केला जात आहे. आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, शाखाप्रमुख, जिल्हा परिषद अशा प्रत्येक स्तरावर आमच्याकडे जास्त संख्याबळ असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर शिवसेनेत महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या प्रतिनिधी सभेतील दोन तृतीयांश सदस्य आपल्या बाजूला असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात तसे घडल्यास उद्धव ठाकरे मोठ्या अडचणीत येऊ शकतात. गेल्या काही दिवसांत भाजपसोबत राजकीय संसार थाटलेल्या एकनाथ शिंदे गटाकडून प्रत्येक कायदेशीर पाऊल पूर्ण वेळ घेऊन आणि काळजीपूर्वक टाकले जात आहे. आता निवडणूक आयोगापुढे एकनाथ शिंदे आपली बाजू कशी मांडतात हे पाहावे लागेल, तर उद्धव ठाकरे शिवसेना आपल्याकडे ठेवण्यासाठी काय करणार याकडेही सर्वांच्या नजरा असणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -