घरमहाराष्ट्रशिवसेना-भाजपने सरकार स्थापन करावे

शिवसेना-भाजपने सरकार स्थापन करावे

Subscribe

अखेरच्या एका तासापर्यंत काहीही होऊ शकते

गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेला सत्ता स्थापनेचा घोळ अद्यापही कायम असताना बुधवारी त्यात नवी भर पडली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या प्रकरणी सूचक वक्तव्य करत चोवीस तास शिल्लक असताना शेवटच्या तासात काहीही होऊ शकते, असे भाकीत वर्तवले. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, राज्यातील जनतेने शिवसेना आणि भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे सेना आणि भाजपने लवकरात लवकर सरकार स्थापन करावे, असे आवाहन देखील शरद पवार यांनी यावेळी केले.

दिल्लीत मंगळवारी झालेल्या पोलिसांवरील हल्ला आणि राज्यातील दुष्काळ संदर्भातील माहिती देण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी वरील भाकीत वर्तवले. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी शरद पवार म्हणाले की, आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला आहे; पण ज्यांना लोकांनी संधी दिली त्यांनी लवकरात लवकर सरकार बनवावे आणि आम्हाला विरोधात बसण्याची संधी द्यावी. आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करू. आपल्याकडे कोणीही प्रस्ताव घेऊन आलेले नाही. तसेच संख्याबळ असते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सरकार स्थापन केले असते. तसे ते झालेले नाही, लोकांनी त्यांना निर्णय दिला आहे.

आता भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे आणि आम्हाला सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी काँग्रेसचे अहमद पटेल आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीवर देखील निशाणा साधला. अहमद पटेल हे गडकरींकडे कोणत्या तरी रोडचा प्रस्ताव घेऊन गेले असतील, त्याशिवाय कोणत्याही प्रस्तावाचे काहीही होणार नाही, असे वक्तव्यही पवार यांनी केले.

- Advertisement -

बुधवारी सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ‘शिवसेना आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे सरकार येईल’, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. दरम्यान, पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या उत्तरावरून सध्या स्थिती पाहता राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाणार नाही, असे चित्र स्पष्ट होत आहे. संजय राऊत नेहमी घेतात तशी भेट झाली. ती भेट नेहमीच सकारात्मक होते तशीच झाली. काही दिवसांपूर्वी राऊत यांनी त्यांच्याकडे १०५ आमदार असल्याचे बोलले होते. तो आकडा कसा आला याचा अंदाज आम्ही देखील घेत आहोत, असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला.

केंद्र सरकारवर साधला निशाणा
दिल्लीत मंगळवारी वकिलांनी पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था पाळणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असून केंद्र सरकारला आपली जबाबदारी नाकारता येणार नाही, केंद्र सरकारने याची नोंद घ्यावी आणि गंभीर पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

ती भीती फक्त शिवसेनेला
राष्ट्रपती राजवट लागू होईल ही भीती फक्त शिवसेनेला वाटते आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. २५ वर्षे युतीत शिवसेना सडली, असे उद्धव ठाकरे म्हटले होते त्याबाबत काय भाष्य कराल, असा प्रश्न जेव्हा शरद पवार यांना विचारण्यात आला तेव्हा २५ वर्षे सडले तरीही एकत्र लढले, असे उत्तर दिले. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

मला मुख्यमंत्रीपदात रस नाही
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास शरद पवार हे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा सुरू आहे. याबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, मी चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषवले आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्री होण्यात मला काहीही रस नाही. असे कोणतेही समीकरण महाराष्ट्रात दिसणार नसल्याचे पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -